आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Poors Wealfare, Financial Prosperous Impossible P. Chidambaram

गरिबांच्या कल्याणाविना आर्थिक समृद्धी अधुरी, चिदंबरम यांचे प्रति‍पादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - देशाची समृद्धी, बळकटी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांगीण विकास आवश्यक आहे. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणासोबतच गरिबांसाठी कल्याणकारी योजना आणि शेतक-यांना त्यांच्या श्रमाचा पूर्ण मोबदला मिळणे गरजेचे आहे, असे मत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.


दै. ‘दिव्य भास्कर’च्या दशकपूर्तीनिमित्त सुरू असलेल्या भास्कर उत्सवात अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, विकास आणि गरिबी निर्मूलनाची भावना निर्माण करून जगातील उच्च विकासदर गाठणाºया देशांच्या पंक्तीत भारत जाईल. सध्या सर्वाधिक विकासदर राखण्यात चीनपाठोपाठ आपला क्रमांक लागतो. चालू आर्थिक वर्षात 6 टक्के आणि 2015 मध्ये 8 टक्के विकासदर गाठण्याची आशा त्यांनी बोलून दाखवली. निवडणुकीनंतर देशात भलेही कोणतेही सरकार आले तरी सर्वांगीण विकासावर भर दिला तरच सध्याच्या संकटातून आम्ही बाहेर येऊ शकतो.


आर्थिक तूट, महागाई मोठी आव्हाने
चिदंबरम यांच्या मते आर्थिक तूट, महागाई आणि चालू खात्यातील घाटा ही मोठी आव्हाने आहेत. ठोक महागाई काबूत आहे. घटून पाच टक्क्यांच्या पातळीवर आली आहे. परंतु किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर खाली आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. चांगल्या मान्सूनमुळे तो खाली येईल. कोअर इन्फ्लेशन आणि उत्पादन क्षेत्रातील महागाई कमी करण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. विदेशी चलनाची स्थिती भक्कम करण्यासाठी निर्यात वाढवणे गरजेचे आहे. विदेशी चलन वाढवण्यासाठी सरकार एफडीआय, एफआयआयसारखे उपाय आणखी आकर्षक करत आहे. त्यासाठी सुधारणांची नितांत गरज आहे. देशातील बेस्ट ब्रेन संकटातून बाहेर येण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.


रिझर्व्ह बँकेने विकासावरही भर द्यावा
पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्री म्हणाले की, मूल्यांच्या स्थैर्याची हमी देतानाच विकासाचा वेग वाढवणेही रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे. याशिवाय रोजगारनिर्मितीकडेही लक्ष द्यावे. कमर्शियल बँका व्याजदरात वाढ करणार नाहीत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कर्जांची मागणी पूर्ण करण्यासाठी बँकांकडे पुरेसा निधी आहे. भरमसाठ गुंतवणूक योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी उद्योगांवर आहे.


लोकांच्या मुद्द्यांचा निपटारा करावा
देशात महागाई, मंदी, संथ गतीने विकास तसेच रुपयाची अस्थिरता आणि निवडणुकीमुळे अविश्वासाचे वातावरण आहे. भांडवली गुंतवणूकदारांचा विश्वास उद्योगपती गमावत आहेत, असे भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल म्हणाले. अशा वेळी सरकारने लोकांचे मुद्दे प्राधान्याने सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भास्कर समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. भारत अग्रवाल यांनीही कार्यक्रमात आपले विचार मांडले.

दक्षिणेतही भास्कर समूह दाखल होईल : चिदंबरम
दैनिक भास्कर समूह आगामी काळात दक्षिणेतील राज्यांतही प्रादेशिक वृत्तपत्रांच्या जगात दाखल होईल, अशी आशा चिदंबरम यांनी व्यक्त केली. हल्ली ‘न्यूज पेपर व्ह्यूज पेपर’ झाले असल्याचे सांगून पहिल्या पानांवर कायम मते मांडलेली असतात. बातमी आत एखाद्या पानावर लपलेली असते, असे ते म्हणाले. समाजात लोकांशी संवादाचे माध्यमच मुळात हा मीडिया असले तरी वृत्तपत्रांचे वाचक आज वृत्तवाहिन्यांकडे वळत असल्याचे चिदंबरम म्हणाले. वाहिन्यांवर चोवीस तास सुरू असलेल्या प्रसारणांचा फायदा होतो. तरीही 25 टक्के वाचकांना याच बातम्या पुन्हा वृत्तपत्रांत वाचायला आवडतात. हिंदी किंवा अन्य प्रादेशिक वृत्तपत्र आपण वाचत नसलो तरी ही प्रादेशिक वृत्तपत्रे आजही स्थान टिकवून ठेवण्यास सक्षम असल्याचे ते म्हणाले. ‘दिव्य भास्कर’च्या दशकपूर्तीनिमित्त भास्कर उत्सवामध्ये आयोजित एका ‘टॉक शो’मध्ये ते बोलत होते. चिदंबरम पुढे म्हणाले की, वृत्तपत्रे आता न्यूज आणि व्ह्यूजच्या सीमारेषा मिटवत आहेत. लोकांना शुद्ध बातम्या हव्या आहेत. परंतु वृत्तपत्रे व्ह्यूज पेपर झाले आहेत. फक्त बातम्या देण्याची जबाबदारी आधी पूर्ण करणे हे वृत्तपत्रांचे कर्तव्य आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व हळूहळू कमी होत असतानाच टीव्ही, इंटरनेट त्यांची जागा घेत आहेत. अशा वेळी फायनान्शियल टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, बीबीसी किंवा अल जझीराची उदाहरणे समोर ठेवूनच भारतीय वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना विश्वासार्हतेचे मापदंड कायम ठेवावे लागतील. असे केल्यानेच त्यांचा टिकाव लागेल. दैनिक भास्कर समूहाच्या यशामागे त्यांची तटस्थ भूमिका आणि लोकाभिमुख पत्रकारिता ही कारणे आहेत.