आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उशिरा उठणाऱ्या पत्नीची बिछान्यावरच पतीकडे चहाची मागणी क्रौर्य नव्हे, यावर पती घटस्फोट मागू शकत नाही’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पत्नी सकाळी उशिरा उठत असेल, ती पतीकडे बिछान्यावरच चहाची मागणी करत असेल तर ती केवळ आळशी आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. पत्नी आळशी असणे ‘क्रौर्य’ होत नाही. याच आधारे पती पत्नीकडून घटस्फोट घेऊ शकत नाही, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने केली.

न्या. प्रदीप नंदराजोग व न्या. प्रतिभा राणी यांच्या न्यायपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीत पतीची याचिका फेटाळली. न्यायपीठ म्हणाले, पतीने पत्नीवर ठेवलेले आरोप सुस्पष्ट नाहीत. त्यांनी यासंदर्भात विस्ताराने सांगितले नाही. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत आहोत.
निकालात पुढे म्हटले की, ‘पतीच्या म्हणण्यानुसार पत्नीने ऑगस्ट २०१२ नंतर शरीरसंबंधास नकार दिला. ते ग्राह्य धरले तरी पत्नी मे २०१२ च्या तिसऱ्या आठवड्यात गरोदर होती हे त्याने समजून घेतले पाहिजे. गरोदरपणात संबंध ठेवणे तिला अडचणीचे वाटले असावे. याशिवाय संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत पत्नीने पतीला यासाठी नकार दिला तरी यातून पत्नीचे क्रौर्य सिद्ध होऊ शकत नाही.’ याआधी कौटुंबिक न्यायालयाने निकालात म्हटले होते की, पतीकडून याचिकेत नमूद केलेले आरोप निरर्थक व सुस्पष्ट नाहीत. याच आधारे पती घटस्फोट घेऊ शकत नाही.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीत पत्नीने दीर्घकाळापासून संबंधास नकार देणे आणि त्यासाठी योग्य कारण न देणाऱ्या पत्नीची कृती मानसिक क्रौर्य ठरवली होती. उच्च न्यायालयाने घटस्फोटासाठी तो
आधारही ठरवला होता.

१००० रुपयांत महानगरात उदरनिर्वाह अवघड
नवी दिल्ली | अन्य एका प्रकरणात दिल्लीच्या जिल्हा न्यायालयाने पतीला पत्नीची पोटगी वाढवण्याचा आदेश दिला. विशेष न्यायाधीश रमेशकुमार यांनी छतरपूर येथील महिलेच्या याचिकेवर ही रक्कम १००० रुपयांवरून ३००० रु. करण्याचा आदेश बजावला. न्यायालय म्हणाले, “महानगरात कोणालाही हजार रुपयांत घरखर्च करणे कठीण ठरते. कायदेशीर पतीच्या नात्याने पत्नी व मुलांचे पालनपोषण करणे त्याचे कर्तव्य आहे. पती या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही.’
बातम्या आणखी आहेत...