आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Come Together Against CBI Director Ranjit Sinha

बलात्कारांबद्दल वक्तव्य करणारे सीबीआय संचालक रणजित सिन्हांविरूध्‍द स्त्रीशक्ती एकटवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सट्टेबाजी रोखण्याचे उपाय सांगताना बलात्कारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांच्या विरोधात देशभर नारीशक्ती एकवटली. राष्‍ट्रीय महिला आयोगानेही नोटीस बजावल्यानंतर सिन्हा यांनी अखेर माफी मागितली.
सिन्हा म्हणाले, ‘महिलांचा मी मनस्वी सन्मान करतो. त्यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. सट्टेबाजीला सरळ कायदेशीर मान्यता द्यावी, हा संदर्भ देऊन मी बोलत होतो.’
मंगळवारी सीबीआयच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्यांनी ‘बलात्कार आपण रोखू शकत नसूत तर त्याचा आनंद लुटला पाहिजे...’ असे संतापजनक वक्तव्य केले होते. यावर माजी आयपीएस किरण बेदी यांनी तत्काळ संतप्त प्रतिक्रिया दिली होती. बुधवारी महिला-बालकल्याण मंत्री कृष्णा तिरथ, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, माकपच्या वृंदा कारत, भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारामन, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या कविता कृष्णन यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सिन्हा यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे सांगून उच्चपदावरील व्यक्तीकडून ही अपेक्षा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आयोग आक्रमक : राष्‍ट्रीय महिला आयोगाने सिन्हा यांना नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे. आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत प्रभावळकर म्हणाल्या, ‘सिन्हा इतके बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकतात? हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेचेच द्योतक आहे.’ सिन्हा यांनी खुलासा केल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करायची हे ठरवले जाईल, असेही त्या म्हणाल्या. असले प्रकार सहन केले जाऊ शकत नाहीत. त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी आयोग करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.