आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- महिलांवरील अत्याचार वाढले असून, त्यांना सुरक्षित असल्याचे वाटत नाही. साधे बसमधून प्रवास करतानाही त्यांची छेड काढली जात आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने परखड मत व्यक्त केले. एवढेच नाही तर हे प्रकार अलीकडे पाच वर्षांतच कसे काय वाढले आहेत? सरकारवरील लोकांचा विश्वास का उडाला आणि ते रस्त्यावर का उतरत आहेत, असे जळजळीत सवालही न्यायालयाने केले आहेत.
न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने हे मत मांडले. दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी निदर्शने करणा-या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की, दहा वर्षांपूर्वी असे प्रकार घडत नव्हते. मागील पाच वर्षांतच महिलांवरील अत्याचार समोर येत आहेत. निदर्शनांमुळे काही तुरळक घटना तेवढ्या उजेडात येतात. परंतु असे अनेक प्रकार समोर येतही नाहीत. गतवर्षी 16 डिसेंबर रोजी दिल्लीत झालेली अत्याचाराची घटना वेगळी नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. बसमधून प्रवास करणा-या मुलींना रोजच छेडछाडीला तोंड द्यावे लागते. निर्भयाची आठवण आम्हाला आहे, परंतु त्याआधीही अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले.
लोकांचा विश्वास उडाला
अत्याचाराच्या घटनांविरोधात लोक थेट रस्त्यावर उतरत आहेत. कारण ते समाधानी नाहीत. सरकारी यंत्रणांवरील त्यांचा विश्वास उठला आहे. आपल्या हक्काचे संरक्षण होते आहे असे लोकांना वाटत नाही. त्यामुळेच त्यांना हा मार्ग निवडावा लागत आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.