आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Dibetis Day : Dibetis Patients Life Recovering New Medicines

जागतिक मधुमेह दिन : मधुमेहींचे आयुष्य सुकर करणारी नवी औषधे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मधुमेहग्रस्ताला रोज सहन करावा लागणारा इन्सुलिन इंजेक्शन्सचा त्रास, औषधे व रक्तदाब कमी -जास्त होण्याची चिंता आता करण्याची गरज नाही. या आजारावर तोडगा शोधण्यासाठी जगभरात क्रांतिकारी संशोधने सुरू
आहे. विविध टप्प्यांवर पोहोचलेल्या या इंजेक्शन्स व औषधांबाबत दै. दिव्य मराठी नेटवर्कने मेदांता मेडिसिटीतील एंडोक्रायनोलॉजी व डायबिटीस विभागाचे प्रमुख डॉ. अंबरीश मित्तल यांच्याशी संवाद साधला...
इन्सुलिन डेग्लूडेक
(याच महिन्यात बाजारात)
सुमारे 90 वर्षांपासून मधुमेहासाठी इन्सुलिनच्या नवनव्या लसींची निर्मिती होत आहे. मात्र ‘इन्सुलिन डेग्लूडेक’ने रुग्णांसाठी नवी आशा जागवली आहे. डॉ. मित्तल यांनी सांगितले की, आपली शर्करापातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णांना 24 तासांत एकदा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. मात्र ‘इन्सुलिन डेग्लूडेक’चे वैशिष्ट्य असे की, एखाद्या करणाने रुग्णाचा इन्सुलिन डोस हुकला तरी त्याची शर्करापातळी सामान्यच राहते. एका इंजेक्शनानंतर पुढील 36 ते 40 तास वा दोन दिवसांपर्यंत डोस घेण्याची गरज नसते. भारतात त्याच्या वैद्यकीय चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. ‘इन्सुलिन डेग्लूडेक’ याच महिन्यात बाजारात उपलब्ध होईल.
जीएलपी-1 अ‍ॅगोनिस्ट इंजेक्शन (येत्या वर्षापर्यंत)
फक्त एक डोस ‘बायड्यूरॉन- जीएलपी-1’ इन्सुलिन इंजेक्शनचा घ्या अन् आठवडाभर निश्चिंत राहा. दररोजच्या इंजेक्शनची कटकट मिटवण्यासाठी अमेरिकेत संशोधने सुरू आहेत. नवे इंजेक्शन ग्लुकागॉन व ग्लुकोज लेव्हल या दोघांनाही एकाच वेळी कमी करण्यात फायदेशीर ठरेल. याशिवाय मधुमेहग्रस्तांना जेवणानंतर घ्याव्या लागणा-या गोळ्यांपासूनही ते मुक्ती देईल. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) त्याच्या चाचणीस परवानगी दिली आहे. सध्या अनेक पातळ्यांवर त्याच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षापर्यंत हे इंजेक्शन भारतीय बाजारात येईल. सध्या रुग्णांना दररोज व्हिक्टोजाचे इंजेक्शन घ्यावे लागते.
ग्लिप्टिन (डीपीपी 4 टॅब्लेट्स)
आठवडाभराच्या इन्सुलिनच्या इंजेक्शनप्रमाणेच रुग्णांना आता सात दिवसांसाठी फक्त एकच गोळी घ्यावी लागेल. डायबिटीस -2 प्रकारच्या रुग्णांसाठी ग्लिप्टिन गोळी तयार केली जात आहे. ती शरीरात ग्लुकोज वाढवणा-या ग्लुकागॉनला घटवण्यात फायदेशीर आहे. गोळीमुळे शरीरात इन्सुलिनची मात्र वाढते व भूक घटते. येत्या एक-दोन वर्षांत ही गोळी बाजारात येण्याची शक्यता आहे.
एसजीएलटी-2 टॅब्लेट्स
डायबिटीस टाइप 2 च्या रुग्णांसाठी ही गोळी वरदान ठरू शकते. यामुळे दररोज वेगवेगळ्या गोळ्या खाण्याची कटकट कायमची दूर होईल. एफडीएकडून या गोळीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. ही गोळी किडनीमध्ये ग्लुकोजला थांबूच देत नाही, असे चाचणीत आढळून आले आहे. यामुळे ग्लुकोज मूत्रासह शरीराबाहेर पडते. किडनीत ग्लुकोजनिर्मितीही होणार नाही. रक्तातही त्याचे प्रमाण कमी होत जाईल. आगामी पाच वर्षांत येणारे हे औषध हायपरग्लायसीमियावर नियंत्रण आणण्यात फायदेशीर ठरेल. मधुमेहग्रस्तांना या गोळीद्वारे वजन घटवण्यातही फायदा होईल.