आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- चिनी ड्रॅगन जगाभोवतीचा आपला पाश आवळत चालला आहे. जगभरातील कंपन्यांवर सायबर हल्ले करून महत्त्वाची गोपनीय माहिती चोरण्याचा धडाकाच चिनी लष्कराने लावला आहे. भारतासह जगातील शंभरहून अधिक कंपन्यावरील सायबर हल्ल्यामागे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका शाखेचा हात असल्याची शक्यता संसदेत शुक्रवारी व्यक्त करण्यात आली.
दक्षिण कोरियावर नुकताच सायबर हल्ला होऊन तेथील बँका आणि टीव्ही चॅनेलचे नेटवर्क पूर्णत: ठप्प झाले होते. हा सायबर हल्लाही चीनमधून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या पार्श्वभूमीवर संसदेत व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेतील मँडियन्ट या संगणक सुरक्षा कंपनीने 19 फेब्रुवारी रोजी जागतिक पातळीवरील सायबर हल्ल्यांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील आघाडीच्या वृत्तपत्रांनीही तो प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतासह जगातील शंभराहून अधिक कंपन्यांवरील सायबर हल्ले चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका शाखेने घडवून आणले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, अशी माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
बचावासाठी बहुआयामी रणनीती - वाढते सायबर हल्ले लक्षात घेता सामरिक घडामोडींशी संबंधित असलेल्या भारतीय संस्थांमध्ये इंटरनेट आणि कार्यालयीन नेटवर्कमध्ये सक्तीने अंतर राखले जात आहे. सायबर स्पेसचा संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी तांत्रिक, प्रशासकीय, कायदेशीर आणि सार्वजनिक अशा पैलूंचा समावेश असलेली एकीकृत बहुआयामी रणनीती सरकारने अंगीकारली आहे, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.
तीन भारतीय कंपन्या- जगभरात हॅकिंग अँटकच्या बळी पडलेल्या 141 कंपन्यांमध्ये तीन भारतीय संस्थांचा समावेश आहे. सायबर हल्ल्याला बळी पडलेल्या तीन संस्थाच्या संगणकामध्ये भारतीय लष्करी संस्थांच्या संगणकाचा समावेश नाही.
ड्रॅगनचे युनिट 61398- राजकीय आर्थिक, वैज्ञानिक आणि सामरिक माहितीची हेरगिरी करण्यासाठी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये युनिट 61398 ची स्थापना करण्यात आली आहे. सायबर जगतामध्ये ही शाखा 'कॉमेंट क्रू' म्हणून ओळखली जाते. जगभरातील बहुतांश सायबर हल्ले चिनी भूमितूनच झाल्याचे सायबर सुरक्षा संस्थांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.