आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Hunging Stay On Hold By Supreme Court

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. याकूब मेमनने फाशीच्या शिक्षेचा फेरआढावा घ्यावा, अशी विनंती करणारा अर्ज सादर केला आहे. त्यावर न्यायालयाने महाराष्ट्र विशेष कृती गट आणि सीबीआयचे मत मागवले आहे.

न्यायमूर्ती ए. आर. दवे, न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या तीन सदस्यांच्या न्यायपीठासमोर मेमनच्या अर्जावर खुली सुनावणी झाली. त्याच्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत फाशीच्या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम राहील, असे न्यायपीठाने सांगितले आणि २८ जानेवारीला २०१५ ला पुढील सुनावणी ठेवली.

मेमनच्या वकिलाने न्यायपीठाला सांगितले की, मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्याचे कोणतेही कारण विशेष न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाही. अनेक सहआरोपींनी दिलेल्या जबाबावरूनच त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. संपूर्ण निकाल देण्यापूर्वीच विशेष टाडा न्यायालयाने मेमनला दोषी ठरवले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

त्यामुळे त्याला दिलेली शिक्षा अवैध आहे. यापूर्वी आढावा याचिकांवर न्यायमूर्तींच्या कक्षात निर्णय होत असे. मात्र त्यानंतर अशा याचिकांवर खुल्या न्यायालयात सुनावणी होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

आपल्या आढावा याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी करावी, असा अर्ज मेमनने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि इतरांकडून म्हणणे मागवले होते. त्याच वेळी मेमनच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीही दिली होती.

प्रदीर्घ न्यायालयीन लढाईदरम्यान अनेक वर्षे तुरुंगात काढली हे फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याचे कारण होऊ शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने २ जूनला दिला होता. तसेच फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या याचिकेवरील सुनावणी खुल्या न्यायालयात करावी, असे आदेश दिले होते.

आधी खुली सुनावणी
यापूर्वी निठारी हत्याकांडातील आरोपी सुरिंदर कोली याने खुल्या न्यायालयात सुनावणी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्या याचिकेवर तशी सुनावणी झाली होती.