आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसजीबाबत सरकारची दिशाभूल, आंतरराष्ट्रीय मोहिमेची गरज नव्हती: यशवंत सिन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अणु पुरवठादार गटात प्रवेश मिळावा यासाठी केंद्र सरकारची दिशाभूल करण्यात आली आहे. देशाने या वळणावर ‘कमावले नसून गमावले’ आहे, अशा शब्दांत भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी सरकारला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला.

एलिट ग्रुपमध्ये जाण्याची खरे तर गरजच नव्हती. तेही ‘अर्जदार’ होऊन जाणे कदापि योग्य नव्हते. शोभणारे नव्हते. वास्तविक देशाला एनएसजी सदस्यत्वाची गरज नाही. कारण अगोदर भारताकडे त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच आपण एनएसजीबाहेर आहोत. हे आपल्याच सोयीचे आहे. सरकारने केलेल्या मोहिमेतून हाती काहीही लागले नाही. भारताने अशा प्रकारचे सदस्यत्व स्वीकारूच नये, असे मत मी मांडले होते. अर्जदार म्हणून जाण्याची जायला नको होते, असे ८३ वर्षीय सिन्हा यांनी रोखठोकपणे सांगितले. ४८ सदस्यीय अणु पुरवठादार गटात भारताला स्थान मिळणार नसल्याचे अलीकडेच स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला.

सेऊलमध्ये बैठकीच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताश्कंदमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी जिनपिंग यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. गुण-दोषाचे मूल्यमापन करून भारताला पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी जिनपिंग यांना केली होती. परंतु चीनने एनपीटीवर स्वाक्षरी केल्याशिवाय पाठिंबा देऊ शकत नाही, अशी ताठर भूमिका घेतली. त्यात देशाची मोहिम अयशस्वी ठरल्याने नाचक्की झाली.सीमेवरील पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने सुरू असलेल्या कुरापतींवर सिन्हा यांनी सरकारचा समाचार घेतला. सध्या परिस्थिती फार वेगळी आहे. आमची त्यांना (सरकार) गरज वाटत नाही. म्हणून आम्ही साधा सल्ला देखील देऊ शकत नाहीत. बोलायचे तरी काय असा प्रश्न पडतो. परंतु मी अनेकदा सरकारचा चुका जाहीरपणे सांगितल्या. सल्ला विचारला असता तर ही चुकी झाली नसती, असे सिन्हा म्हणाले.

वर्षाखेरीस प्रवेशासंबंधी एनएसजीची बैठक :
अणु पुरवठादार गटाची वर्षाखेरीस बैठक होणार आहे. त्यात एनपीटी नसलेल्या देशांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे भारताला आपला दावा करण्याची दुसरी संधी मिळाली आहे. मेक्सिकोच्या दबावानंतर एनएसजीने वर्षाच्या अखेरीस दुसरी बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे. मेक्सिकोच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला. परंतु त्याला अमेरिकेसह अन्य देशांनी त्यास पाठिंबा दिला. एनएसजीने अनौपचारिक सल्लागार समितीची स्थापना केली आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी अर्जेटिनाच्या राजदूत राफेल ग्रॉसी आहेत.
सुरुवातीपासून सरकारला विरोध
यशवंत सिन्हा हे भाजपमधील नाराज गटातील मानले जातात. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्ये सिन्हा यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपद होते. मोदी सरकारच्या स्थापनेपासून सिन्हा यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सुरूवातीपासून ते मोदी सरकारवर टीका करत आले आहेत. सरकारच्या धोरणांवर जाहीरपणे वारंवार टीका केली. पाकिस्तानबाबतचे धोरणही चुकले आहे. मोदी सरकार त्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...