आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘योगा डे’ची नोंद गिनीज बुकात करण्याचे उद्दिष्ट, तयारी जोरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय योग दिनाला एका मोठ्या इव्हेंटप्रमाणे साजरे करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आयुष मंत्रालयाद्वारे योगा डेसाठी नोंदणी सुरू आहे. या इव्हेंटमध्ये ४० हजार नागरिकांना सहभागी करून घेण्याचे नियोजन मंत्रालय करत आहे. २१ जून रोजी साज-या होणा-या या दिवसाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्याचे उद्दिष्ट आयुष मंत्रालयाने जाहीर केले. गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदवण्याच्या अटी अत्यंत काटेकोर व सक्तीच्या आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे मंत्रालयाच्या उच्चाधिका-याने म्हटले आहे. एकाच स्थळावर योगाचे सर्वात भव्य सादरीकरण करण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याला मंजुरी दिली. यासंबंधीचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ठेवला होता. प्रस्तावाला १७५ सदस्यांनी अनुमोदन दिले. जगातील १९० देशांतील २५० शहरांत हा दिवस सार्वजनिक स्तरावर साजरा करण्यात येईल.

३५ मिनिटांचा इव्हेंट, पंतप्रधानही योगमुद्रेत
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित हे सादरीकरण ३५ मिनिटांचे असेल. राजपथावर सकाळी ७ वाजता सोहळा सुरू होईल. यात विद्यार्थी विविध आसने सादर करतील. यात अधिकारी, इतर सरकारी कर्मचारी व सामान्य नागरिक सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची योगमुद्रा पाहण्याची संधीही कदाचित मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. योग दिनाचे प्रमुख समन्वयक व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पंतप्रधानही योगासन करण्याची शक्यता वर्तवली.