आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपच्या पक्ष विस्तारासाठी दिल्ली झाली लाँचिंग पॅड : योगेंद्र यादव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा केंद्र सरकारशी सातत्याने संघर्ष सुरू असतानाच स्वराज इंडिया या पक्षानेही आता ‘आप’वर टीकास्त्र सोडले आहे. आपला दिल्लीतील प्रशासनात खूपच कमी रस आहे, इतर राज्यांत विस्तार करण्यासाठी हा पक्ष दिल्लीचा लाँच पॅडसारखा वापर करत आहे, अशी टीका स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी बुधवारी केली.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यादव म्हणाले की, आपचे लक्ष दिल्लीबाहेरच केंद्रित झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील संसाधनांचा वापर आपल्या पक्षाचा बाहेरच्या राज्यांत विस्तार करण्यासाठी करत आहेत. त्यांनी राजधानीतील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. दिल्लीवासीय संसर्गजन्य आजारांशी लढत असताना मुख्यमंत्री केजरीवाल, आपचे मंत्री आणि आमदार मात्र नेहमीच दिल्लीबाहेर असतात. आपचे सरकार दिल्लीचा फक्त पायरी म्हणून वापर करत आहेत. त्यांना दिल्लीतील संसाधने वापरायची आहेत. त्यांची नजर आता पंजाब आणि गोवा या राज्यांवर आहे, अशी टीकाही
त्यांनी केली.
नायब राज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख आहेत, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. तेव्हापासून आपचा प्रशासनातील सर्व रस संपला आहे, असा उल्लेख करून यादव म्हणाले की, एकेकाळी आपने संपूर्ण लक्ष दिल्लीवर केंद्रित केले होते. आता त्यांना तेथे काहीच रस उरलेला नाही. कोणीही दोन दावे एकाच वेळी करू शकत नाही. एकीकडे आमच्याकडे पोलिस आणि जमीन नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे आम्ही दिल्लीचे परिवर्तन केले असे म्हणायचे... हेच दिल्लीचे प्रशासकीय मॉडेल आहे.
भाजपवरही टीका : दिल्लीत संसर्गजन्य आजारांचा फैलाव झाल्याबद्दल यादव यांनी भाजप आणि केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, दिल्लीत प्रशासनाचा अभाव आहे. दिल्ली सरकार, नायब राज्यपाल कार्यालय, डीडीए यापैकी कुठेही प्रशासन अस्तित्वात नाही. दिल्लीचे सर्व मंत्री बाहेर आहेत असे माध्यमे सांगत होती. त्याच वेळी उत्तर दिल्लीतील भाजपचे महापौर परदेशात होते. भाजपची स्थितीही आपसारखीच आहे. दिल्लीवासीयांना आता सुशासनाची प्रतीक्षा आहे.
‘व्होट-कटवा’ व्हायचे नाही
पंजाबमधील निवडणूक का लढवत नाही, या प्रश्नावर यादव म्हणाले की, राजकीय पक्ष स्थापन केला म्हणून सगळीकडेच निवडणूक लढवावी, असा अर्थ होत नाही. आम्हाला ‘व्होट-कटवा’ व्हायचे नाही. कोणाची तरी मते कापायची म्हणून आम्ही निवडणूक लढवणार नाही. आम्ही तसे राजकारण करणार नाही.
मग यंत्रांची खरेदी कशी?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपण एक पेनही खरेदी करू शकत नाही, या केजरीवाल यांच्या ट्विटबद्दल टीका करताना यादव म्हणाले की, केजरीवाल यांनी ६०० फॉगिंग मशीन्स खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. जी व्यक्ती एक पेनही खरेदी करू शकत नाही ती ६०० मशीन्स कशी खरेदी करू शकेल?
बातम्या आणखी आहेत...