आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogendra Yadav Will Announce New Political Party

योगेंद्र यादव करणार राजकीय पक्षाची घोषणा, १४ एप्रिलला संघटनेची होणार वर्षपूर्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - योगेंद्र यादव तसेच प्रशांत भूषण यांच्या नेतृत्वाखाली स्वराज अभियानकडून पुढल्या आठवड्यात नवीन राजकीय पक्षाची स्थापना होणार आहे. तशी आैपचारिक घोषणा या नेत्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीतून बाहेर पडल्यानंतर यादव तसेच भूषण यांनी स्वराज अभियान हा गट तयार केला होता.
गेल्या वर्षी १४ एप्रिलला तो सुरू झाला होता. आता त्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे १४ एप्रिल रोजी आम्ही राजकीय पक्षाच्या स्थापनेबद्दल बोलू. त्याचबरोबर आमची राजकीय भूमिकादेखील स्पष्ट करू. हा पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेखाली काम करेल, असे स्वराज अभियानच्या नेत्यांनी सांगितले. वास्तविक दोन्ही नेत्यांनी ही संघटना राजकीय हेतूने प्रेरित कधीही काम करणार नाही, असे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही एक अराजकीय स्वरूपाची संघटना आहे, असेही म्हटले होते. परंतु आता स्वराज अभियानचे उद्देश दिसू लागले आहेत. पंजाबमध्ये स्वराज अभियानला राजकीय पक्षाच्या माध्यमातून तत्काळ यश मिळवणे सोपे होणार आहे. धरमवीरा गांधी, हरिंदरसिंग खालसा या आपच्या खासदारांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निलंबन झाले होते. या नाराजांना एकत्र आणून राजकीय पक्षाची पंजाबात बांधणी करण्याची योजना स्वराज अभियानने केल्याचे दिसते. दिल्लीत स्वराज अभियान स्थानिक स्वराज्य संस्थेत आपच्या विरोधात मैदानात उतरेल. त्यामुळे भविष्यात पूर्वाश्रमीचे मित्र वेगवेगळ्या निवडणूकांत आमने सामने येतील हे स्पष्ट होते.

निवडणूक डोळ्यासमोर
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. आम आदमी पार्टीने अगोदरच पंजाबमध्ये जोमाने कामास सुरुवात केली आहे. काही भागात मोहीम सुरू करण्यात आली आहे. अलीकडेच आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी काही दिवस पंजाबचा दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वराज अभियानच्या दोन्ही नेत्यांनी राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्याचा निर्णय घेतला.