नवी दिल्ली - जनतेच्या राष्ट्रपतीच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी गर्दी झाली होती. 10, राजाजी रोडवर डॉ. कलाम यांचे पार्थिव पोहोचण्याआधीच दुपारी एकपासूनच याठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. महिला, तरुण, ज्येष्ठ अशा सर्व वयोगटातील नागरिक
आपल्या लाडक्या वैज्ञानिक, लेखक आणि राष्ट्रपतीच्या अखेरच्या दर्शनासाठी रांगा लावून होते.
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा विशिष्ट मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सायंकाळी सुमारे चारपासून सामान्य नागरिकांसाठी अंत्यदर्शन सुरू करण्यात आले. रांगेत उभे असलेले लोक अंत्यदर्शनासाठी अनेक तासांपासून रांगेत उभे होते. प्रत्येकाचे डोळे पाणावलेले होते आणि चेह-यावर दुःख स्पष्टपणे जाणवत होते. जणू आपल्या घरातील एखादा सदस्य आपल्याला कायमचा सोडून गेला असावा, अशाच प्रत्येकाच्या भावना होत्या.
अनेक लोक हातात फुले, फुलांचे गुच्छ, कलामांचे फोटो घेऊन उभे होते. त्याठिकाणी उभे असलेले लोक एकमेकांना कलामांशी संबंधित आठवणी सांगत होते. कलामांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी बॅरिकेड्स, मेटल डिटेक्टर लावलेले होते. पण गर्दी एवढी जास्त होती की, अनेकवेळा बॅरिकेड्स, डिटेक्टर पडत होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लाडक्या राष्ट्रपतीच्या अंत्यदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या तरुणांचे PHOTOS