आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांच्या भावविश्वातील ड्रीम जॉबची स्थिती विदारक, सात हजार पायलट बेरोजगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पांढराशुभ्र पोशाख, दोन-अडीच लाखांचे सुरुवातीचे पॅकेज आणि हवेशी संवाद साधण्याचा रोमांच. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सोनिपतच्या दीपक मलिकने वैमानिक होण्यासाठी आठ वर्षांपूर्वी कानपूरच्या खासगी अकॅडमीत प्रवेश घेतला होता. त्याच वर्षी तो बारावी उत्तीर्ण झाला होता. ३५ लाख रुपये खर्च केल्यानंतर दीपकला नुकतीच चार्टर्ड हेलिकॉप्टर कंपनीत ग्राउंड स्टाफमध्ये नोकरी मिळाली आहे. वेतन कसेबसे २५ हजार रुपये प्रति महिना. दीपकचे अनेक सहकारी कॉल सेंटरमध्ये नोकरी करत आहेत. बारावी उत्तीर्ण तरुणांना आणखी दुसरी कोणती नोकरी मिळेल? स्वप्न धुळीस मिळालेला दीपक एकमेव वैमानिक नाही. त्याच्यासारख्या सात हजार वैमानिकांनी बेरोजगार पायलट असोसिएशनची स्थापना केली आहे. सरकारने चांगले धोरण आखावे, अशी त्यांची मागणी आहे. एअर इंडियाने ५० प्रशिक्षणार्थी वैमानिकांना मानसिक चाचणीत अपयशी ठरल्याचे कारण देत नोकरीस नकार दिला. एअर इंडियाने अशी पहिल्यांदाच परीक्षा घेतली होती. जर्मनविंग्जच्या सहवैमानिकाची मानसिक स्थिती बरी नसल्यामुळे जाणीवपूर्वक विमान अपघात केल्याच्या घटनेनंतर वैमानिकांसाठी मानसिक क्षमता चाचणी अनिवार्य केली आहे. या प्रशिक्षणार्थींना अद्याप नोकरी नाही. काही महिन्यांपूर्वी स्पाइसजेटमधून काढलेल्या १२५ वैमानिकांना जेट, विस्तारा, एअर एशिया आणि गो एअर कंपन्यांनी त्यांच्या अनुभवामुळे नोकरी दिली. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ३५ लाख ते १ कोटीपर्यंत खर्च येतो. एअर इंडियाने ५० प्रशिक्षणार्थी वैमानिकांना नोकरी नाकारण्यामागचे कारण आहेे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, केवळ व्यावसायिक वैमानिक परवानाधारकांना घेतल्यानंतर त्यांना टाइप रेटिंग ट्रेनिंग म्हणजे बोइंग/एअरबस/ एटीआर उडवण्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेण्यासाठी ३५ लाख रुपये प्रतिव्यक्ती खर्च एअरलाइन्सला भरावा लागतो. अशा स्थितीत प्रशिक्षणार्थी वैमानिकाएेवजी आम्ही ट्रेंड आणि टाइप रेटेड पायलटची निवड केली. याचा अर्थ एअरलाइनमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांना बोइंग, एअरबस किंवा एटीआरसारखी मोठी िवमाने उडवण्यासाठी अतिरिक्त प्रशिक्षणाचा खर्च करावा लागत आहे. एखादी कंपनी सीपीएल वैमानिकाला नोकरी देत असेल तर टाइप रेटिंगचा खर्च ३५ लाख रुपये उमेदवाराकडून वसूल केला जातो.

४५० असे वर्गीकृत (टाइपरेटेड) प्रशिक्षित पायलट ज्यांनी प्रशिक्षणावर १ कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे, बेरोजगार आहेत. समस्या ही आहे की कंपन्यांकडे वेगवेगळ्या डिझाइनची विमाने आहेत. उदाहरणार्थ इंडिगो व एअर एशियाकडे फक्त एअरबस आहेत. तर जेट व स्पाइस जेडकडे बोइंगचा ताफा आहे. जेटलाइटकडे बहुतांश छोटे एटीआरच आहेत. एखाद्या पायलटने एअरबसवर टाइप रेटिंग केली आहे तर तो जेट, जेटलाइट व स्पाइसजेटमध्ये नोकरीसाठी अपात्र आहे. अनुभव व टाइपरेटेड पायलट्स जास्त दिवस बेरोजगार राहत नाहीत. एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (काॅर्पोरेट, कम्युनिकेशन) जी. प्रसाद राव सांगतात, आम्हाला २०० पायलट हवे आहेत. केवळ टाइपरेटेड पायलटकडूनच अर्ज मागवण्यात आले होते. परंतु केवळ १६० पायलटच लेखी परीक्षा व मुलाखत पातळीपर्यंत येऊ शकले. त्यापैकी केवळ ११० जण मानसिक क्षमता चाचणी (सायकोमॅट्रिक)उत्तीर्ण झाले. महासंचालक नागरी उड्डयनचे (डीजीसीए) लायसेन्सिंग प्रभारी भारत भूषण यांनी सांगितले, अाज पायलट बनणे सोपे नाही. केवळ श्रीमंतांची मुलेच याचा खर्च उचलण्यास सक्षम आहेत. एक माजी कमांडर म्हणाले, हे एखाद्या फिल्मी करिअरसारखे आहे. जबरदस्त स्ट्रगल. घर भागवण्याचेही वांधे. पण यश मिळाले तर मागे वळून बघण्याची गरज नाही. पायलट बनण्याची जिद्द लोकांमध्ये २००५-२००६ मध्ये निर्माण झाली. त्या वेळी अर्थव्यवस्था बहरात होती. जेट, इंडिगो, किंगफिशर, स्पाइसजेट व सहारासारख्या विमान कंपन्या सुरू झाल्या होत्या. तेव्हा कंपन्यांकडे पायलट नव्हते. निवृत्त कॅप्टन ए. के. सिंह म्हणाले, तेव्हा ही अवस्था होती की विमान कंपन्या अनुभव विचारतच नव्हत्या. केवळ तुमच्याकडे सीपीएल आहे किंवा नाही हेच बघत होत्या. अनेक प्रकरणांत परवाने नूतनीकरणाची फीसदेखील विमान कंपन्यांनीच दिली. इतकी मोठी मागणी समोर ठेवून प्रत्येक मोठ्या शहरात विमान अकादमी सुरू झाली होती. त्याला कोणतीही प्रवेश परीक्षा नव्हती.

शिफारशीशिवाय नोकरी शक्यच नाही
एअर इंडियाची सायकोमॅट्रिक परीक्षा पास होण्यात अपयशी ठरलेल्या ३५ वर्षीय राकेशकुमारसाठी (नाव बदलले) पायलट होण्याची ही अखेरची संधी होती. त्याने एअर बससाठी टाइप रेटिंग कोर्स एअर इंडियाच्या हैदराबादेतील सेंट्रल ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट (सीटीई) येथून केला होता. तो सांगतो : एक तर एअर इंडियाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा योग्य नाही किंवा पायलट निवडण्याची प्रक्रिया. त्याचा आरोप असाही आहे की एखादा नेता किंवा बड्या अधिकाऱ्याची शिफारस असल्याशिवाय नोकरी मिळत नाही. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याची मुलगी तीन वेळा सीपीएल नापास झाल्यानंतरही आज ती कमर्शियल पायलट आहे. तीही सायकोमॅट्रिक टेस्ट उत्तीर्ण न होता. दुसरीकडे तिच्यापेक्षा चांगले पायलट्स बेरोजगार आहेत. कुमारचे वडील सरकारी सेवेतून निवृत्त झाले. ते मुुंबईत भाड्याच्या घरात राहतात. कुमारच्या करिअरसाठी त्यांनी सर्व मिळकत खर्ची घातली. छोट्या भावाने पाच वर्षांपूर्वी सीमा शुल्क विभागात नोकरी मिळवली. कुमार सांगतो की आता या वयात मला नव्याने करिअरचा शाेध घ्यावा लागत आहे. काय करावे? काहीच समजत नाही.