आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयू, रालोद, झामुमोच्या विलीनीकरणाची चर्चा, बिहार, उत्तर प्रदेशात जदयुला बळ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनता परिवार एकत्र करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता जद (यू), राष्ट्रीय लोकदल, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आणि समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हे विलीनीकरण झाल्यास बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पक्ष मजबूत होईल, अशी आशा या पक्षांच्या नेत्यांना वाटत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, जदयूचे अध्यक्ष शरद यादव, रालोदप्रमुख अजित सिंह, त्यांचे चिरंजीव जयंत चौधरी आणि निवडणुकीची व्यूहरचना तज्ज्ञ प्रशांत किशोर यांची विलीनीकरणासंदर्भात १५ मार्च रोजी दिल्लीत बैठक झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नितीशकुमार हे यासंदर्भात झारखंड विकास मोर्चाचे (प्रजातांत्रिक) नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्याशी थेट बोलणी करत आहेत. मरांडी हे भाजपमधून बाहेर पडले असून त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. दुसरीकडे अजित सिंह आणि जदयूचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी समाजवादी जनता पक्षाचे (राष्ट्रीय) प्रमुख कमल मोरारका यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, हे चारही पक्ष लवकरच विलीन होऊ शकतात. त्याबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. विलीनीकरणाची तारीख निश्चित झाली नसली तरी नवा पक्ष या महिन्यातच अस्तित्वात येऊ शकतो.

जदयू सध्या बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करून सत्तेत आहे. शेजारच्या झारखंडमध्ये काही भागांत जदयूचा प्रभाव आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदलाचा प्रभाव आहे, तर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी स्थापन केलेल्या समाजवादी जनता पक्षाचा (राष्ट्रीय) उत्तर प्रदेशात अल्प प्रभाव आहे. दुसरीकडे आगामी पाच राज्यांतील निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.
बातम्या आणखी आहेत...