आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स तस्कर बच्चा भाईला गोव्यात अटक, केरळ पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी-  केरळ येथील कोची अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गोव्यातील दीपक सोनु कळंगुटकर उर्फ बच्चा भाई (४८) या देऊळवाडा- वागातोर येथील व्यक्तिला ड्रग्स व्यवहार प्रकरणी अटक केली आहे. दीपक कळंगुटकर हा गोव्यातील एक कुख्यात ड्रग्स पेडलर आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाशीही संबंध आहेत, अशी माहिती कोची अबकारी खात्याचे विभागीय उप आयुक्त एम. के. नारायणन कुट्टू यांनी दिली आहे.
 
कोची अबकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात सनीश सोरोथ्थम (३२) याला अटक केली होती. त्याच्याकडून ८५ लाख रूपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. कोची अबकारी अधिकाऱ्यांनी अलिकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई ठरली होती. सनीश सोरोथ्थम याची अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या विशेष पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हा माल गोव्यातून आणल्याचे आणि दीपक कळंगुटकर नामक व्यक्तीकडून मिळवल्याचे त्याने सांगितले. सनीश सोरोथ्थम याच्या मोबाईलवरून दीपक कळंगुटकर याचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला आणि त्यांनी त्याचे कॉल डिटेल्स तपासले. सनीश सोरोथ्थम याला अटक केलेल्या दिवशी दीपक कळंगुटकर याच्याकडून त्याला ८ वेळा कॉल केल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे विभागीय सहाय्यक अबकारी आयुक्त बेन्नी फ्रान्सिस यांनी सांगितले.
 
 दरम्यान, अबकारी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम शनिवारी गोव्यात दाखल झाली. त्यांनी सापळा रचून दीपक कळंगुटकरला ताब्यात घेतले आणि त्याला कोचीला नेले. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कारवाईबाबत राज्यातील अमलीपदार्थ विरोधी पथक मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. अबकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने दीपक कळंगुटकर याच्याशी संपर्क साधून त्याला मोठे आमिष दाखवून एका ठिकाणी बोलावले. तिथे तो पोहचला असता त्याला ताबडतोब ताब्यात घेतले.
 
 एर्नाकुलम पोलिस स्थानकात दीपक कळंगुटकर याच्या विरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. त्याला रिमांड घेण्यात आला असून तो अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, दीपक कळंगुटकर याचा ड्रग्स व्यवसायात मोठा दबदबा आहे. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी बड्या वकिलांची एक टीम सक्रीय आहे. गोव्यातून एक बडे वकील एर्नाकुलम पोलिस स्थानकावर दाखल झाले आहेत आणि ते जबर प्रयत्न करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. दीपक कळंगुटकर याच्या अटकेनंतर काही अबकारी अधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन आल्याचेही कोची पोलिसांच्या सुत्रांकडून कळते.
 
१ जानेवारी ते २७ डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधी पथकाने राज्यात जप्त केलेले अमली पदार्थ
 -एमडीएमए - ८५.९४ ग्रॅम.
 -गांजा - ८ किलो ४०८.१५ ग्रॅम.
- चरस - ३८२.३ ग्रॅम.
- कोकेन - १०.२ ग्रॅम.
- एलएसडी पेपर - २.२ ग्रॅम.
- एलएसडी लिक्विड - ११.७४ ग्रॅम.
- हेरॉईन - ४.६५ ग्रॅम.
- एमपीथामाईन - १५५ ग्रॅ.
एकूण - ९ किलो ०६०.१८ ग्रॅम अमली पदार्थ
 
विविध पोलिस स्थानकाने जप्त केलेले अमली पदार्थ
एमडीएमए - २ ग्रॅम.
गांजा - ३४ किलो २२७.६० ग्रॅम.
चरस - ५ किलो ५९८ ग्रॅम.
कोकेन - २०.५ ग्रॅम.
एलएसडी पेपर - ०.३ ग्रॅम.
ऍक्टेसी - २ ग्रॅम.
अफू -३ किलो ७०० ग्रॅम.
एकूण ४३ किलो ५००.१० ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...