आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांची सीबीआय चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी गोव्याचे राज्यपाल बी. व्ही. वांच्छू यांची सीबीआयने चौकशी केली. सीबीआय गुप्तचर अधिकार्‍यांनी वांच्छू यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवून घेतला. यापूर्वी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन यांचाही सीबीआयने जबाब नोंदवला आहे. दरम्यान, लाचखोरीच्या याच प्रकरणात निवृत्त हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने शुक्रवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील काही आरोपींच्या संपत्तीवरही टाच आणण्यात येणार आहे.

पणजी येथे शुक्रवारी सीबीआय अधिकार्‍यांनी वांच्छू यांचा जबाब नोंदवून घेतला. ब्रिटनस्थित ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत 3600 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर सौद्यात सुमारे 360 कोटी रुपयांची लाचखोरी झाल्याचा आरोप आहे. हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्यासाठी सन 2005 मध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीस नारायणन आणि वांच्छू हजर होते. त्यामुळे त्यांची चौकशी आवश्यक होती, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात त्यागी, त्यांचे कुटुंबीय आणि युरोपियन दलालासह एकूण 13 जणांविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 13 निवृत्त हवाईदल प्रमुख त्यागींसह एकूण 13 जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला.

लाचेची रक्कम बँकांमार्फत पोहोचली
ईडीने या प्रकरणात परदेशी विनिमय उल्लंघन आणि पैशांचा अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा तपासही स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. या घोटाळ्यातील लाच म्हणून मिळालेली रक्कम योग्य व्यक्ती व संस्थांकडे पोहोचवण्यासाठी काही बँकांनीही मदत केल्याचा संशय आहे.

ऑगस्टासाठी आटापिटा
ऑगस्टा वेस्टलँडला कं त्राट मिळावे म्हणून हेलिकॉप्टरच्या तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्यात आला. हेलिकॉप्टरचे फ्लाइंग सीलिंग घटवण्यात आले. त्यामुळे या कंपनीला निविदा भरणे शक्य झाले. तांत्रिक बाबींसाठी झालेल्या या बैठकीस तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नारायणन, वांच्छूही हजर होते.

दहा टक्क्यांचा खेळ
व्हीव्हीआयपी नेत्यांसाठी 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी एकूण 3600 कोटींचा हा करार होता. त्यामध्ये दहा टक्के रक्कम म्हणजे सुमारे 360 कोटी रुपयांची लाच ऑगस्टा वेस्टलँडक डून देण्यात आली. ही लाच त्यागी व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. लाच देण्यासाठी कंपनीने दलालांचा वापर केला.