आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश, लालू, काँग्रेस युती; दहा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपविरोधात मोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे वाहून गेलेल्या विरोधी पक्षांतील नेत्यांनी एकमेकांचा आधार घेत सत्तेचा किनारा गाठण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विधानसभा- 2015 मिशन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि काँग्रेसने दहा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आघाडी केली आहे.

पोटनिवडणुकीत आघाडीला यश मिळाल्यास पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीतील सत्ता समीकरणावर परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते. जागावाटपाच्या सूत्रानुसार जदयू, राजदला प्रत्येकी चार मतदारसंघ मिळाले असून काँग्रेसला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. जदयू, राजद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनुक्रमे बशिष्ट नारायण सिंग, रामचंद्र पुर्बे आणि अशोक चौधरी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आघाडीची घोषणा केली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यातील चर्चेनंतर आघाडीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.

देशाचा मूड बदलतोय, भाजपविरोधी जनमत
21 ऑगस्ट रोजी होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तिन्ही पक्षांची आघाडी सध्याची गरज असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्षांनी त्याचे समर्थन केले आहे. मुंबई आणि दिल्लीच्या दौर्‍यावरून परतलेले नितीशकुमार पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव दिल्लीत आहेत. मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवून सत्तेत आले आहे. आता मात्र देशाचा मूड बदल असून या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपविरोधी जनमत तपासण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सिंग आणि पुर्बे यांनी सांगितले.

राजद-जदयू 15 वर्षे कट्टर विरोधक
एकटी काँग्रेस भाजपशी लढू शकत नसल्याची जाणीव झाल्यामुळेच काँग्रेसने आघाडीचा घाट घातला काय, या प्रश्नावर अशोक चौधरी म्हणाले, एका विचाराच्या पक्षांनी एकत्र येणे ही आजची गरज होती. 15 वर्षे एकमेकांविरुद्ध लढणार्‍या जदयूने राजदशी का हातमिळवणी केली, या प्रश्नावर सिंग यांनी कालच्या वास्तववादी गोष्टींना आज आणि आजच्याला उद्या महत्त्व राहत नाही, असे उत्तर दिले

जदयूकडे हाजीपूर, राजदकडे छपरा
जदयू परबात्ता, मोहानिया(एससी), जले आणि हाजीपूर मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहे. राजदला छपरा, मोहिउद्दीनगर, राजनगर(एससी) आणि बांका मतदारसंघ सुटले आहेत. काँग्रेस भागलपूर आणि नारकटिगंजमधून उमेदवार उभा करणार आहे. संबंधित मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा एक - दोन दिवसांत करण्यात येईल.