आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा पुष्‍कर-थरूर यांचा दिल्लीच्या हॉटेलमध्‍ये संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा शुक्रवारी गूढ मृत्यू झाला. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत त्या मृतावस्थेत आढळल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास कर्मचा-यांनी त्यांना हॉटेलच्या लॉबीत शेवटचे पाहिले होते.पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि शशी थरूर यांच्या ट्विटरवरील संवादांमुळे बुधवारी सुनंदा अस्वस्थ होत्या. तेव्हा थरूर यांनी आपले अकाउंट हॅक झाल्याचे म्हटले होते. याच अकाउंटवर थरूर व मेहर यांच्या विरोधात असंख्य ट्विट पोस्ट झाले होते. ते सर्व ट्विट आपणच केल्याचे सांगून सुनंदा यांनी आपली उघड
नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नव्हे, मेहर ही आयएसआयची एजंट असल्याचेही सुनंदाने म्हटले होते. गुरुवारी या वादावर पडदा पडला आणि सुनंदा-शशी थरूर यांच्यात समेट झाला. थरूर यांनी मेहरशी असलेल्या संबंधांचा स्पष्ट इन्कार केला होता.
दरम्यान, पोलिस हॉटेलच्या लॉबीतील सीसीटीव्ही कॅमे-यांच्या फुटेज तपासत आहेत. हॉटेलमधील कर्मचा-यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय सुनंदा यांच्या कॉल डिटेल्सचीही माहिती घेतली जात आहे. थरूर यांचीही चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.
घटनेबद्दल वेगवेगळी वक्तव्ये
1. थरूर यांचे खासगी सचिव अभिनव यांच्या मते, दिल्लीतील त्यांच्या घरी काम सुरू असल्याने थरूर-सुनंदा दोघेही लीला हॉटेलमध्ये होते. थरूर दिवसभर बैठकीत होते. रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा आतील खोलीत सुनंदा निपचित पडल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
2. माध्यमांनुसार हॉटेलच्या या सूटमध्ये बराच वेळ कुणीही दिसले नाही. एका कर्मचा-याने बेल वाजवली तेव्हा आतून प्रतिसाद मिळाला नाही. दुस-या चावीने दार उघडण्यात आले तेव्हा सुनंदा निपचित पडल्याचे दिसले.
2010 मध्ये झाला होता विवाह : मनुष्यबळ विकासमंत्री शशी थरूर आणि सुनंदा यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता. दोघांचाही हा तिसरा विवाह होता. सुनंदाचा पहिला विवाह काश्मीरचे संजय रैना, दुसरा विवाह केरळचे उद्योजक सुजित सेन यांच्याशी झाला होता. सुजितच्या मृत्यूनंतर सुनंदाने शशी थरूर यांच्याची विवाह केला. ० थरूर यांचा पहिला विवाह तिलोत्तमा मुखर्जीशी, दुसरा विवाह कॅनडास्थित क्रिस्टा हिच्याशी झाला होता. हे संबंध टिकले नाहीत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी सुनंदा पुष्करसोबत तिसरा संसार थाटला होता.
रात्री 8.01 वाजता थरूर यांचे ट्विट
हा खळबळजनक प्रकार उघडकीस येण्यापूर्वी रात्री 8.01 वाजता थरूर यांनी ट्विट केले होते. सुनंदाची प्रकृती बिघडल्याने जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मेहरही ट्विटरवर होती. ही घटना कळाल्यानंतर तिनेही तत्काळ ट्विट करून दु:ख व्यक्त केले.
ओह माय गॉड, व्हॉट द हेल...
ज्या पाकिस्तानी महिला पत्रकाराच्या नावावरून दोन दिवसांपूर्वी वाद पेटला होता त्या मेहर तरारने सुनंदाच्या मृत्यूबद्दल ट्विटरवर ‘ओह माय गॉड, व्हॉट द हेल...’ अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली असल्याचे काही वाहिन्यांनी म्हटले आहे.