राजकोट (गुजरात) - सध्या परीक्षांचा मोसम सुरु आहे. पालक
आपल्या पाल्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याचा आग्रह करत आहेत. पण पालक आणि शिक्षकांचा आग्रह मुलांच्या जीवावर बेतू शकतो याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. गुजरातमधील राजकोटमध्ये तिसरीत शिकत असलेल्या आठ वर्षीय विद्यार्थीनीने परीक्षेच्या धास्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या चिमुकलीची प्राणज्योत मालवली.
हिरल या तिसरीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने मंगळवारी दुपारी घरी कोणी नसताना स्वतःला पेटवून घेतले. तिची आई भावनाबेन आणि वडील मनसुखभाई मोल-मजूरी करतात. हिरलची आई रोजच्या प्रमाणे मंगळवारी सकाळी मजूरीसाठी बाहेर गेली. दुपारी जेव्हा ती घरी आली तेव्हा हिरल गंभीररित्या भाजलेली होती. आई-वडिलांनी हिरलला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा ती वारंवार म्हणत होती, 'पापा मला शाळेत जायचे नाही. मला काही येत नाही.' मंगळवारी सायंकाळी हिरलचा मृत्यू झाला.
भावनाबेन आणि मनसुखभाई यांना तिन अपत्य आहेत, त्यात हिरल सर्वात लहान होती. पोलिसांनी आई-वडिलांचा जबाब नोंदवून घेतला असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.