आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडोदराच्या शाळेत बाथरूममध्ये नववीच्या विद्यार्थ्यांची ३१ वार करून निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा- वडोदऱ्यातील भारती स्कूलच्या बाथरूममध्ये शुक्रवारी सकाळी नववीचा विद्यार्थी देव तडवीचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ही हत्या केली असून तो बेपत्ता आहे. दोघांमध्ये काही कारणावरून वाद होता,त्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या बाथरूमध्ये देववर चार मिनिटांत ३१ वार करून हत्या केली. त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. आरोपी विद्यार्थी बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मृत देवच्या डोक्यात आठ, छातीत २० तर पोट व पाठीत तीन-तीन जखमा दिसून आल्या. पीडित व आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. घटना सकाळची शाळा सुटल्यावर दुपारची शाळा सुरू होण्याआधी झाली. देव तडवी गाजरावाडी भागात मावशी हंसाबेन तडवी यांच्या घरी राहत होता. त्याचे आई-वडील आणंद जिल्ह्यातील बाकरोल गावात राहतात. तीन दिवसांपूर्वी देवने शाळेत प्रवेश घेतला होता. 


दोन दिवसांपूर्वी आरोपी विद्यार्थ्याचे शाळेतील काही मुलांशी भांडण झाले होते. पोलिसांना घटनास्थळाजवळ मंदिरातून आरोपी विद्यार्थ्याची बॅक सापडली. त्यातील चाकूही जप्त करण्यात आला. 


आरोपी विद्यार्थी छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडत होता: आरोपी दहावीचा विद्यार्थी आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून भारती विद्यालयात शिकत आहे. कुटुंबातील तीन अपत्यात तो सर्वात लहान आहे. अभ्यासात बरा आहे, मात्र अभ्यासाची आवड कमी आहे. छोट्या-छोट्या गोष्टीत भांडण करण्याची त्याची सवय आहे. त्याच्या या स्वभावामुळे इतर मुले बोलणे टाळत होते. 

 
आराेपीची आई म्हणाली- माझा मुलगा खूप सनकी आहे 
मुलाच्या कृत्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीची आई पोलिस ठाण्यात आली आणि रडत रडत म्हणाली, मला तीन मुले आहेत. हा सर्वात लहान आहे. तो खूप सनकी आहे. कोणी त्याला पाहून हसले तर तो भांडतो. तीन दिवसांपूर्वी तो शाळेत गृहपाठ करून गेला नव्हता. त्यामुळे शिक्षक रागावले. यावर त्याने घरी येऊन हातावर जखम केली. आम्ही शाळेत गेल्यावर संबंधित शिक्षक समोर आला नाही. अन्य शिक्षकांनी बाजू सावरली. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता तो घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला होता. यानंतर हत्या केल्याची माहिती मिळाली. त्याने बॅगमध्ये काय घेऊन गेला हे घरातील कुणालाच माहीत नव्हते. तो शाळेतूनही पळून गेला आहे. 


पूर्ण तयारीनिशी केली हत्या
आरोपी विद्यार्थी देवची हत्या करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी आला होता. यासोबत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तयारी केली होती. असे करण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील बॅगेत अन्य एका मुलाचे रजिस्टर ठेवले होते. पोलिस अनेक मुलांची चौकशी करत आहेत. 


आरोपीच्या स्कूल बॅगमध्ये चार शस्त्र 
आरोपी विद्यार्थ्याच्या स्कूल बॅगमध्ये मिरची पावडर, पाणी, धारदार शस्त्र, ठोशासह चार शस्त्र मिळाले. आरोपीने हत्या केल्यानंतर बॅग, पांढरा शर्ट छतावरून खाली मंदिरात फेकला. बॅगेत कागदात गुंडाळलेला चाकूही आढळला आहे. मटण कापण्यासाठी वापरले जाणारे धारदार शस्त्रही मिळाले. दोन हाताचे ठोसे, काळ्या रंगाचा शर्ट, स्कूटर शीटचे कव्हर, १० वीचे गुजराती भाषेचे पुस्तक, एक रजिस्टर मिळाले. ते सुनील नावाच्या विद्यार्थ्याचे आहे. या रजिस्टरच्या पानांवर मिरची पावडर लागलेली दिसली. शर्टवर रक्ताचे डाग आहेत. 

बातम्या आणखी आहेत...