आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटेलांनी उपमुख्यमंत्रिपदही स्वीकारले नाही; भाजप सोडावा, महत्त्वाचे पद देऊ- हार्दिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातच्या विजय रुपाणी सरकारमध्ये सर्व काही अालबेल नाही हे स्पष्ट झाले आहे. खातेवाटपावरून नाराज उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मौन धारण केले आहे. त्यामुळे अटकळींना ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीन पटेल यांनी १० आमदारांसह भाजप सोडण्याची तयारी दर्शवल्यास त्यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे पद देण्यासाठी चर्चा करता येऊ शकेल, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. 

 
सारंगपूर येथे शनिवारी हार्दिक पटेल बोलत होते. सर्व पाटीदार समुदायाने पटेल यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. भाजप त्यांचा आदर करत नसल्यास त्यांनी भाजपमधून बाहेर पडले पाहिजे, असे हार्दिक यांनी म्हटले आहे. नितीन पटेल यांच्याकडे आरोग्य व रस्ते बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, त्यांनी अद्याप पद स्वीकारलेले नाही. दुसरीकडे अर्थमंत्री सौरभ पटेल यांनी शनिवारी पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.


२७ वर्षांपासून सेवेत असूनही आज अवमानाची वागणूक
नितीन पटेल गेल्या २७ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. परंतु त्यांना भाजपने अडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांच्या योग्यतेचे पद देण्याची गरज आहे. पाटीदार समुदायाने पटेल यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. माझ्या त्यांना विनंती आहे. त्यांनी उद्धट लोकांची साथ साेडून आमच्यासोबत यावे. त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे हार्दिक पटेल म्हणाले.

 

काँग्रेससोबत चांगल्या प्रशासनासाठी चर्चा
आम्ही काँग्रेससोबत चांगल्या प्रशासनासाठी चर्चा करत आहोत. आम्हाला नितीन पटेल यांची गरज आहे. त्यांना आमची सोबत हवी असल्यास त्यांनी मला तसे कळवावे. त्यांनी पाटीदार समुदायाच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्याच्या भल्यासाठी आपण एकत्र काम करू, असे आवाहन हार्दिक यांनी केले.


पटेल यांच्यासाठी भव्य दालनाची तयारी सुरू  
नितीन पटेल यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांसारखे मोठे कार्यालय तयार करण्याचे काम सुरू आहे. नितीन पटेल यांच्या सध्याच्या कार्यालयाशेजारी हे दालन तयार होत आहे. स्वर्णिम संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर हे कार्यालय तयार केले जात आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. त्यांची मनधरणी होईल का ? हे स्पष्ट नाही.

 

सरकारी गाडीचा वापर बंद 
26 डिसेंबरला मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा मंत्र्यांचे खातेवाटप झाले. यात नितीन पटेल यांच्या नाराजीमुले मंत्रिमंडळाची पहिली बैठकही 4 तास उशीरा सुरू झाली असे सांगितले जाते. त्यानंतर पत्रकार परिषदेतही नितीन पटेल एकदम शांत होते. पटेल यांनी तर सरकारी गाडीचा वापरही बंद केला असल्याचे सांगितले जात आहे. ते खासगी गाडीचा वापर करत आहेत. 


रूपाणींनी महत्त्वाची खाती स्वतःजवळ ठेवली 
नितिन पटेल यांच्याकडून अर्थ खात्याचा प्रभार मागे घेऊन मंत्रिमंडळात पुनरागमन करणाऱ्या माजी अर्थमंत्री सौरभ पटेल यांना देण्यात आले. त्याचे नगर विकास आणि पेट्रो रसायन खाते मुख्यमंत्री रुपाणींनी स्वतःकडे ठेवले. पटेल यांना आरोग्य खात्याचा प्रभार पुन्हा एकदा दिला आहे. त्यांच्याकडे रस्ते आणि निवास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, नर्मदा, कल्पसर आणि राजधानी योजना असे खाते आहेत. 

बातम्या आणखी आहेत...