आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजात मराठीसाठी माेदींना भेटणार: मुख्यमंत्री;अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद‌्घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी (बडोदे)- ‘गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मराठी माणसाची मागणी अाहे. याचे काम अंतिम टप्प्यात अाहे. त्यासाठी अापण लवकरच महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना भेटणार अाहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.


बडोदा येथे सुरू असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त डाॅ. रघुवीर चाैधरी व फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद‌्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलन अाणि अभिजात मराठी भाषेच्या दर्जाबद्दल प्रामुख्याने घाेषणा केल्या. ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अापण प्रयत्न करत अाहाेत. यातील सगळ्याच अडचणी दूर झाल्या अाहेत. 


लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे हा विषय यावा, यासाठी अामचा पाठपुरावा सुरू अाहे. महाराष्ट्रातील साहित्यिकांचे एक शिष्टमंडळ घेऊन अापण पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेटही घेणार अाहाेत.  अापली मराठी भाषा ही अभिजात अाहेच. फक्त त्यावर अभिजाततेची मुद्रा उमटवून घेण्याचे काम अापल्याला करायचे अाहे,’ असेही फडणवीस म्हणाले.


पुढील संमेलन भिलारला
राज्य सरकारच्या पुढाकाराने महाबळेश्वरजवळील भिलार येथे पुस्तकांचे गाव विकसित करण्यात आले आहे. येथे पुढील साहित्य संमेलन घ्यावे, त्याचा पूर्ण खर्च राज्य सरकार करेल असे अाश्वासन वजा निमंत्रण मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिले.


आता निधी ५० लाख
संमेलनाचे बदलते स्वरूप, वाढती महागाई आणि मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य सरकारने १ कोटी रुपये द्यावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून होत होती. ती अंशतः मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे साहित्य संमेलनाला ५० लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले.


भाषांच्या समृद्धतेसाठी अावाज उठवायला हवा

देशात केवळ मराठीच नव्हे तर सर्वच भाषांची दयनीय अवस्था झाली अाहे. सर्वत्र इंग्रजीचा पगडा दिसताे. इंग्रजीला अवास्तव महत्त्व दिले जाते. अाता तरी वेगळीच व्यवहार भाषा म्हणून वापरली जाते. याबाबत खराेखर विद्वानांनी, साहित्यिकांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज अाहे. त्यासाठी अापण मराठी साहित्यिक संमेलनाच्या माध्यमातून एकत्र येत अाहाेच. 


याविषयी सर्वच भाषांतील ज्ञानी लाेकांनी चिंतन करून ठाेस भूमिका घेऊन पुढे यायला हवे. अाता संमेलनाच्या माध्यमातून नेतृत्व मिळालेच अाहे. याच  नेतृत्त्वाखाली अापण भाषांच्या समृद्धतेसाठी एकत्र येत अावाज उठवायला हवा, असे मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डाॅ. रघुवीर चाैधरी यांनी व्यक्त केले.

 

मराठी विद्यापीठाचा विचार
मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे अशी मागणी महामंडळातर्फे हाेत आहे. हे विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे व्हावे अशीही मागणी असल्याचे आठवणीत ठेवून मराठीचे विद्यापीठ विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

संघर्ष करावाचा लागेल
मराठी भाषेच्या अभिजात दर्जा मिळवण्याबराेबरच ज्ञानभाषा, प्रचार अाणि प्रसारासाठी अाम्ही अनेक वर्षे संघर्ष करत अाहाेत. हा संघर्ष अद्यापही कायम अाहे. अाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी मराठीच्या अभिजाततेसाठी पंतप्रधानांची भेट घेण्याचे अाणि भाषेसाठी इतर अश्वासने दिली असली तरी अामचा संघर्ष कायम राहील, असे मत मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळेे यांनी व्यक्त केले.

 

मुख्यमंत्रीही म्हणाले, होय, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..!

उद‌्घाटन साेहळ्यात फडणवीस यांचे भाषण सुरू होताच सीमावासीयांनी जोरदार घोषणा दिल्या. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणा त्यांनी दिल्या. त्याला मुख्यमंत्र्यांनीही लगाेलग “होय, झालाच पाहिजे’ असा प्रतिसाद दिला. ‘या  मागणीची आपण नोंद घेतो. संमेलनात अशा मागण्या होणे हे संमेलनाचे मोठेपण असून अभिव्यक्तीचे ते द्योतक अाहे,’ असेही म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी सुरू असलेल्या या घाेषणाही तत्काळ बंद झाल्या.   

 


पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...