आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, Narendra Modi, BJP, Gujarat, Divya Marathi

केजरीवालांना ऐनवेळी भेटण्यास मोदींचा नकार, गॅसदराबाबत करायची होती चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - मोदी सरकारच्या विकास मॉडेलचा पंचनामा करण्यासाठी गुजरात दौ-यावर आलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी गांधीनगर येथे पोहोचताच आपला ताफा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे वळवला. गॅसदराबाबत नरेंद्र मोदींशी चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ मागितली, परंतु मोदींनी त्यांना भेट नाकारली. मुख्यमंत्र्यांची वेळ घ्या, दोन-तीन दिवसांत कळवू, असे सांगून केजरीवाल यांच्या दूताची बोळवण करण्यात आली. त्यानंतर केजरीवाल जयपूरला निघून गेले. दरम्यान, मोदींवर टीका करण्याची एकही संधी न सोडणा-या केजरीवाल यांनी आता मोदींना 16 प्रश्न विचारले आहेत.


गॅस दर आणि गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे कारण पुढे करत केजरीवालांनी शुक्रवारी अचानक मोदींच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला; परंतु पोलिसांनी त्यांना निवासस्थानापासून पाच किलोमीटर अंतरावर असतानाच रोखले. केजरीवाल यांच्यासमवेत मनीष सिसोदियादेखील होते. नैसर्गिक वायूच्या दरात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचा फायदा थेट रिलायन्स कंपनीला होणार आहे. या प्रस्तावाला पाठिंबा देणार का, असा सवाल केजरीवाल यांनी अनेक सभांमधून उपस्थित केला होता. त्याचबरोबर मोदी हे अंबानी यांच्यातखिशातील नेते आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. या मुद्द्यावर मोदींना कोंडीत पकडण्यासाठी केजरीवाल यांनी या अचानक भेटीची योजना आखली होती; परंतु त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही.


जयपूरला रवाना
केजरीवाल यांनी कार थांबवली. सिसोदिया त्यांच्यासोबत होते. सिसोदियांनी केजरीवाल यांच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन वेळ मागण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना वेळ मिळू शकली नाही. त्यानंतर ते
विमानतळावर गेले. तेथून ते जयपूरला रवाना झाले.


गुजरात मॉडेलचा पंचनामा करणारे 16 प्रश्न
गुजरात आणि राज्याचा विकास या मुद्द्यावर केजरीवाल यांनी मोदींना 16 प्रश्न विचारले आहेत. त्यासंदर्भात मोदींशी चर्चा करण्याची त्यांची योजना होती; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर मोदींनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, अशी मागणी केजरीवाल यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ते प्रश्न पुढीलप्रमाणे
1. यूपीएने अगोदरच दुपटीने वाढवलेल्या गॅस दरात तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर वाढ करणार आहात का ?
2. गुजरात सरकार सौरऊर्जेची प्रतियुनिट 13 रुपयांनी खरेदी का करत आहे ? वास्तविक मध्य प्रदेश आणि कर्नाटक हीच वीज अनुक्रमे 7.50 आणि 5 रुपयाने खरेदी करत आहे.
3. कृषी विकासाचा वार्षिक दर 1.18 टक्क्यांनी घसरल्याचे राज्य सरकारचेच आकडे सांगत आहेत. महसुलातही घट झाली आहे. मग कृषी क्षेत्राचा 11 टक्के विकास झाल्याचा दावा कोणत्या आधारे करत आहात ?
4. दहा वर्षांपासून उद्योग बंद पडत चालले आहेत. तुम्ही उद्योग क्षेत्र मोजक्या बड्या उद्योग समूहांच्या दावणीला बांधणार का ?
5. तलाठी नियुक्तीसाठी 10 लाख मोजावे लागतात. मग सर्व स्तरावरील भ्रष्टाचार कसा निपटून काढणार ?
6. खाण प्रकरणातील दोषी बाबू बोखारिया आणि मत्स्य घोटाळ्यातील पुरुषोत्तम सोलंकी तुमच्या मंत्रिमंडळात कसे ?
7. अंबानी कुटुंबाचे जावई असलेल्या मंत्र्याच्या हाती गुजरातची नैसर्गिक साधनसंपत्ती का सोपवली ?
8. तलाठी पदाच्या 1500 जागांसाठी 13 लाख उमेदवारांनी अर्ज केलेला असताना बेरोजगारीची समस्या संपल्याचा दावा कसा केला जातो ?
9. तरुण पदवीधारकांना पाच वर्षांपासून करार तत्त्वावर 5 हजार 300 रुपये महिन्याला दिले जातात. हे शोषण नाही का ?
10. राज्य सरकारी शाळांमध्ये 600 विद्यार्थ्यांसाठी केवळ तीन शिक्षक आहेत. त्यावर काय सांगाल ?
11. गुजरातची वैद्यकीय व आरोग्य सेवा भ्रष्टाचाराने बरबटलेली नाही का ?
12. गेल्या काही वर्षांत 800 शेतक-यांनी गुजरातमध्ये आत्महत्या केल्या. त्यावर काय प्रतिक्रिया द्याल ?
13. चोवीस तास वीजपुरवठ्याचा दावा करता, मग चार लाख शेतक-यांपर्यंत अद्याप वीज का पोहोचली नाही ?
14. सरदार सरोवराची उंची 2005 मध्ये वाढवली खरी, परंतु कच्छमधील जनता अजूनही पाण्यापासून वंचित आहे. मग हे पाणी उद्योगाला कसे काय मिळते ?
15. कच्छमधील शीख शेतक-यांना जमिनी परत करण्याच्या आश्वासनाऐवजी गुजरातने अद्याप खटले का मागे घेतले नाहीत ?
16. तुमच्याकडे किती विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत? त्यांची मालकी कोणाकडे आहे ? तुम्ही हवाई खर्चाची माहिती जाहीर का करत नाहीत ?