राजकोट- पोरबंदरचे भाजपचे खासदार विठ्ठल रादडिया यांनी गुजरातमधील पटेल समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. खासदार रादडिया यांचा मुलगा कल्पेश याचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांनी विधवा सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. रादडिया यांच्या सुनेचे नाव मनिषा असून त्यांनी तिला मुलगी समजून स्वर्गवासी मुलाची जवळपास 100 कोटींची संपत्ती कन्यादानात दिली. जामकंडोरणा येथे शुक्रवारी (26 सप्टेंबर) सकाळी विवाह समारंभ संपन्न झाला.
रादडिया यांचा धाकटा मुलगा कल्पेश उर्फ काना याचे नऊ महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले. कल्पेशला दोन मुले आहेत. मनिषा आणि मुलांचा भविष्याचा विचार करून त्यांनी मनिषाचा पुनर्विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. नवरात्रीच्या पवित्र पर्वात मनिषा आणि हार्दीक कुमार याचा पुनर्विवाह लावून दिला.
हार्दिक कुमार हे सुरतमध्ये विठ्ठल रादडिया यांचा मुलगा ललितभाई यांच्या ऑफिसात कार्यरत आहे. शुक्रवारी (26 सप्टेंबर) जामकंडोरणा येथे पर्यटन मंत्री जयेश रादडिया, चेतन रामाणी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हार्दिक आणि मनिषाचा विवाह संपन्न झाला. विठ्ठल रादडिया यांनी स्वत:
आपल्या सुनेचे कन्यादान करून 100 कोटी रुपयांची संपत्ती तिच्या नावावर केली.
विठ्ठल रादडिया हे पर्यटन मंत्री जयेश रादडिया यांचे वडील आहेत. जयेश रादडिया म्हणाले, माझ्या वडिलांनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या आदर्श निर्णयामुळे समाजाला नक्कीच एक दिशा मिळेल.