आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींचे चरित्र : माहितीचा महापूर, खुलाशांचा अभाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2002 च्या गुजरात दंगलीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत संपूर्ण देशात विविध मतप्रवाह आहेत. एक गट मोदींच्या निष्क्रियतेला जबाबदार मानतो, तर दुसरा गट ही दंगल म्हणजे गोध्रा घटनेवर झालेली उत्स्फूर्र्त प्रतिक्रिया मानत असून सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करतो. पोलिस, एसआयटी, सीबीआय, न्यायालय - यापैकी कोणीही आजपर्यंत निर्विवादपणे यामागील सत्य सांगू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर दंगलीच्या काळात गुजरातमध्ये टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक म्हणून कार्यरत असलेले किंगशुक नाग यांचे ‘द नमो स्टोरी, अ पॉलिटिकल लाइफ’ या पुस्तकातून ‘आतली’ माहिती मिळेल, अशी आशा वाटली. नाग यांनी केलेल्या कार्यासाठी अहमदाबाद येथे त्यांना ‘प्रेम भाटिया’ पुरस्कार मिळाल्याने ही आशा दृढ झाली होती. पण हे पुस्तक वाचल्यावर माहिती तर खूप मिळते, पण आतल्या गोटातील माहिती नसल्यात जमा आहे.

गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अपयश आणि गुंतवणूकदार संमेलन अशा एक दोन बाबी सोडल्या, तर 200 पानांच्या या नमो स्टोरीमध्ये नवीन असे काहीच नाही. ना मोदींच्या खासगी आयुष्याबद्दल, ना त्यांच्या कार्यशैलीबाबत, ना गुजरातबाबत तसेच या काळात घडलेल्या विवादास्पद घटनांबाबतही नाही! संपूर्ण पुस्तक एक रिपोर्ताज आहे. याच्या प्रत्येक पानावर नाग यांनी ज्यांच्यासोबत काम केले असे पत्रकार आणि काही निवृत्त झालेले सरकारी अधिकारी यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले आहे. अधिकांश माहिती तर भाजपचे अनामिक नेते, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच सामाजिक अनामिक यांच्याकडून समजल्याचे सांगितले आहे. निम्मे पुस्तक तर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला वाहिलेले आहे. थोडे लक्षपूर्वक वाचा - ‘सानंद येथे नॅनोचा प्रकल्प उभारण्यासाठी मोदी सरकारने टाटा मोटर्सला 30 हजार कोटी रुपयांची सवलत दिली.’ ही माहिती सरकारी कागदपत्रांतून नव्हे, तर राज्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या एका अनामिक नेत्याने दिली.

मोदींची कार्यशैली, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इंटरनेट, थ्री डी इमेजसह निवडणुकीत उतरण्याची कल्पना त्यांना कोणी दिली? दंगल काळात मोदींची भूमिका काय होती? हे सर्व जाणून घेण्यास वाचक उत्सुक असतील, पण पुस्तकात कोणताही दस्तऐवज, अहवाल, पुस्तक कशाकशाचा उल्लेख नाही. टाइम्स आॅफ इंडियाच्या संपादकाकडून अपेक्षित असलेले प्रामाणिक मत या पुस्तकात कोठेही नाही.

त्यांनी काही खासगी बाबींचा उल्लेख केला आहे, पण त्यात धक्कादायक असे काहीच नाही. उदाहरणार्थ दंगलीच्या तिस-या दिवशी अहमदाबादला पोहोचलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांची नाग यांनी भेट घेतली. तीन तास चाललेल्या या बैठकीच्या शेवटी जॉर्ज यांनी नाग यांना विचारले की, ‘दंगलखोरांना ‘कार्यभाग’ साधता यावा यासाठी तीन दिवसांची मुदत दिल्याचे सांगितले जाते, हे खरे आहे का?’ यावर नाग यांनी उत्तर दिले की, ‘असे ऐकण्यात तर आले होते, पण नक्की काही सांगता येत नाही.’ सगळे पुस्तकच अशा अर्धवट माहितीवर आधारलेले आहे. मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात आणि त्यांचे विक्रीमूल्य पाहता नाग यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

लेखक : किंगशुक नाग
प्रकाशक : रोली बुक्स
एकूण पाने : 188
मूल्य : ५ 295