आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी पुढे, नितीश मागे; भाजपला 10 पैकी 6 तर काँग्रेसला केवळ एकच जागा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/नवी दिल्ली- पाच राज्यांतील दहा जागांवरील पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले. यात 4 लोकसभा, तर 6 विधानसभेच्या जागा आहेत. बोलबाला मात्र गुजरातचाच झाला. किंबहुना नरेंद्र मोदी यांचाच. गुजरातेत जागा जास्त होत्या म्हणून नव्हे, तर राज्यात सर्व 6 जागा काँग्रेसकडून भाजपने हिसकावल्या आहेत.
निकालातून आणखी एक बाब समोर आली असून, ती म्हणजे बिहार वगळता सत्ताधारी पक्ष विजयी झाले आहेत. म्हणजेच विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे कौतुक झालेले नितीशकुमारच राज्यात कमकुवत दिसत आहेत. भाजपमध्ये आनंदोत्सव साजरा होत असला तरी पक्षातीलच मोदीविरोधी गटाला मात्र हादरा बसला. काँग्रेसला आनंद होण्याजोगे फार काही झाले नाही. त्यामुळे पक्षाने निकालावर प्रतिक्रियाही आडवळणाने दिली आहे. भाजपचा भलेही विजय असेल, पण रालोआचा घटकपक्ष जदयू बिहारात पराभूत आहे, हा काँग्रेसचा युक्तिवाद. निकालाने आनंद मिळत नाही, तेव्हाच अशी प्रतिक्रिया उमटते.

या निकालांचे अर्थ काय ?

मोदींची ताकद वाढली
गुजरातच्या 6 जागा भाजपने केवळ जिंकल्या नाहीत तर कॉँग्रेसकडून खेचून आणल्या. त्यामुळे मोदींची ताकद वाढली. 7 जूनला होणाºया बैठकीत ही ताकद दिसेल.

काय मिळणार? गोव्याच्या बैठकीत राष्ट्रीय प्रचार समितीचे प्रमुखपद मिळण्याची शक्यता.
काय गमावणार? अडवाणी गटाचा पक्षातून विरोध. पंतप्रधानपदासाठी ‘एनडीए’त नितीश यांचा विरोध.
फायदा काय? ‘एनडीए’त नितीश यांच्यापेक्षा वजन वाढेल.

विजयानंतर मोदींचे वागणे ‘पीएम’ उमेदवारासारखे
विजयानंतर मोदी गुजरातबाबत बोलले नाहीत. ‘यूपीएची कमजोरी सिद्ध झाली, केंद्राचे काउंटडाऊन सुरू झाले,’ असे ते म्हणाले.

भाजपचा नाइलाज
भाजप आता मोदींच्या ताकदीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. गोव्याच्या बैठकीत महत्त्वाची जबाबदारी द्यावीच लागेल. मोदी कमजोर असल्याच्या तुलनाही बंद कराव्या लागतील.

काँग्रेस कमकुवत
पाच राज्यांत पोटनिवडणुका, पैकी तीन राज्यात तर कॉँग्रेस स्पर्धेतही नव्हती. गुजरातमध्ये सहा जागा गमावल्या. महाराष्टÑात केवळ जागा राखली. यातून पक्ष कमकुवत झाल्याचे सिद्ध झाले.

नितीश यांना मात
ज्या ठिकाणी जदचा पराभव झाला, तेथे नितीश यांनी प्रचार केला होता. 12 सभा घेतल्या. मित्रपक्ष असूनही भाजपला फिरकूही दिले नाही. आता भाजप म्हणते, स्वतंत्र लढण्यानेच पराभव झाला.

ठरवावे लागेल, मुख्य शत्रू लालू की मोदी?
ज्यांचा आपण विरोध करत आहोत ते मोदी आपले मुख्य शत्रू आहेत की लालू, हे नितीश यांना ठरवावे लागेल. निश्चितच लालू. कारण त्यांच्या मुख्यमंत्रिपदाला लालूंकडूनच धोका आहे.

तर मोदींबाबत नरमाई?
‘एनडीए’त महत्त्व कमी होईल. लोकसभेसाठी भाजपसोबत आघाडी करावीच लागेल. स्वबळावर लढल्यास पराभवाची भीती. त्यामुळे मोदींबाबत नरमाईचे धोरण शक्य.

प्रथमच मोदींनी राखले अंतर
बुधवारी अंतर्गत सुरक्षेबाबत दिल्लीत बैठक झाली. नितीश छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासोबत चर्चा करत होते, त्याच वेळी मोदीही आले. नितीश मोदींकडे पाहत होते, तर मोदींचे लक्ष निवडणूक निकालांकडे होते. मोदींनी नितीश यांच्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी नितीश मोदींपासून दूर राहत होते. मोदींनी पहिल्यांदा नितीश यांच्यापासून अंतर राखले.

पराभवामुळे आघाडीत बिघाडी
० भाजपने राजदच्या मदतीने जदयूला पाडले.
- पी.के. साही, जदयूचे पराभूत उमेदवार (महाराजगंज)
० विकासपुरुष नितीश का हरले, चिंतन करावे
-गिरिराज सिंह, भाजप कोट्यातून बिहारचे मंत्री
वास्तव : या जागेवर जमीनदार कमी वेळा जिंकले

रादडिया टोलवर रोखली होती बंदूक
पोरबंदरमधून विजयी झालेले विठ्ठल रादडिया टोलनाक्यावर बंदूक रोखल्याने चर्चेत आले होते. कॉँग्रेस सोडून मुलासह भाजपात आले. वडील खासदार झाले, तर मुलगा आमदार बनला.

प्रसून फुटबॉलचे माजी कर्णधार
हावडातून विजयी झालेले प्रसून बॅनर्जी फुटबॉलच्या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन व कोच होते. 2009 मध्ये कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर तृणमूलने जागा जिंकली होती, यंदा माकपशी लढत झाली.

प्रभुनाथ पूर्वाश्रमीचे नितीश समर्थक
महाराजगंजमधील विजयी प्रभुनाथ नितीश यांच्या मर्जीतील मानले जात. मात्र मागील निवडणूक जदयूकडून हरले. नंतर राजदत गेले व विजयी झाले.