आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cctv Footage Shows Cops Vandalising Cars In Ahmedabad

गुजरात हिंसा: कारच्या काचा फोडताना दिसले पोलिस, CCTV फुटेज आले समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पाटीदार पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाने दोन दिवस गुजरात होरपळत होता. या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबार आणि लाठीचार्जचे 9 बळी झाले आहेत. दरम्यान, एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले, त्यात 20 पोलिस कर्मचारी त्यांच्या हातातील दंडुक्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडत आहेत. व्हिडिओ अहमदाबादमधील एका सोसायटीच्या पार्किंगचा आहे. हे पोलिसवाले कोण होते आणि त्यांनी उभ्या असलेल्या कारचे नुकसान का केले हे कळू शकलेले नाही.

पोलिस कारवाईवर पहिल्यापासूनच प्रश्नचिन्ह
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी रात्री उपोषणाला बसलेले आंदोलनाचे संयोजक हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला होता. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये हिंसाचार भडकला. पोलिसांच्या भूमिकेवर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केला होता. हार्दिक पटेलनेही पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
परिस्थिती तणावपूर्ण
गुरुवारी गुजरातमधील काही शहरांमधील संचारबंदी (कर्फ्यू) उठवण्यात आली असली तरी परिस्थिती तणावपूर्ण आहे. अहमदाबाद, सूरत, राजकोट, मेहसाणा, पालनपूर, उंझा, जामनगरमध्ये अजूनही कर्फ्यू आहे. अनेक शहरांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.

रेल्वे सेवेवरही परिणाम
अहमदाबादमध्ये बुधवारी लष्कराने पथसंचलन केले. अनेक भागात रेल्वे सेवेवरही बंदचा परिणाम झाला आहे. आंदोलकांनी रेल्वेलाही लक्ष्य केले. त्यामुळे 12 रेल्वे रद्द करण्यात आल्या. रेल्वेसेवा विस्कळीत झाली. पोलिस कंट्रोलरुमच्या माहितीनूसार, बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना सोडल्यास हिंसाचार थांबला आहे.