अहमदाबाद - लोकसभा निवडणुकीत मतदान करून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ दाखवणारे सेल्फी छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर टाकले होते. प्रकरणाचा तपास करणार्या यंत्रणेला गुजरात उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत फटकारले आहे. तपासातील दिरंगाईबद्दल अहमदाबाद पोलिसांना याप्रकरणी तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 26 ऑगस्ट रोजी होणार आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुजरातमध्ये 30 एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी (आता पंतप्रधान) अहमदाबादमधील राणिप मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. बाहेर आल्यानंतर मोदींनी मतदान केंद्र परिसरातच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या वेळी त्यांच्या बोटावरील भाजपचे मतदान चिन्ह असलेल्या कमळाचा मोबाइलवर सेल्फी काढून दाखवला. नंतर हे चित्र सोशल मीडियावर तसेच माध्यमांमध्ये बरेच चर्चिले गेले. त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
आयोगाच्या निर्देशानुसार अहमदाबाद पोलिसांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, परंतु नंतर त्यात काहीच प्रगती झाली नाही. त्यावर आम आदमी पार्टीतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. प्रकरणाच्या तपासाची अँक्शन टेकन रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी 26 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.