आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडोदरा -चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी ‘सायबर आर्मी ’तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही राष्ट्रीय पक्षांत सोशल मीडियावर जुगलबंदी पाहायला मिळू शकते.
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी ही टीम काम करेल. सोशल मीडियातून भाजपशी दोन हात करण्यात येतील, अशी माहिती काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिली. सोमवारी सायंकाळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात आले. भरूच येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. काँग्रेस पक्ष सर्व प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तयार आहे. सत्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. लोकांमध्ये फूट पाडण्याची भाजपची नीती आहे, असे पटेल म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पटेल हे राजकीय सचिव आहेत. गुजरात हे विकसित राज्य आहे. ते महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या महान नेत्यांच्या विचारसरणीवर वाटचाल करत आहे. हे नेते आज हयात असते तर त्यांनी मोदींच्या विकास मॉडेलला कधीही स्वीकारले नसते. दुसरीकडे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतील निकाल ही काही ‘मोदी लाट’ नाही, असा दावा पटेल यांनी केला आहे.
नेमके काम काय करणार?
सायबर आर्मी स्थापन करण्यामागे पक्षाचा वेगळा उद्देश आहे. यूपीए सरकारच्या कामगिरीबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांना जोडणारा दुवा म्हणून सायबर आर्मी काम करणार आहे.
शिवसेनेने मोदींना फटकारले
महाराष्ट्रात आतापर्यंत 26 मुख्यमंत्री झाले; परंतु गुजरातच्या तुलनेत विकास कमी झाला, असे मोदींनी रविवारी झालेल्या सभेत म्हटले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तून मोदींना सुनावले. मोदी आता देशाचे नेते झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राची चिंता करणे सोडून द्यावे.
‘मोदी फॉर पीएम’भाजपचा नारा
भाजपने पुन्हा काँग्रेसच्या विरोधात जोरदार दंड थोपटताना लोकसभेसाठी धोरण जाहीर केले. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘मोदी फॉर पीएम’चे घोषवाक्य तयार केले आहे.
1975 मध्ये काँग्रेसने आणीबाणी लादली होती. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी भाजपचे सरकार आवश्यक असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील मोहीम पक्ष राबवणार आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस अनंतकुमार यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या काळात जसे आंदोलन केले होते तसेच भाजपचे ‘मोदी फॉर पीएम’ हे आंदोलन आहे. यंदाचे वर्ष खूप चांगले आहे. कारण विरोधी पक्ष मत मिळवून काही करिश्मा करेल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. ताज्या विधानसभा निवडणुकांनी हे दाखवून दिले आहे. भाजपची काय ताकद आहे, हे विरोधकांना या निवडणुकीतून समजले आहे, असे कुमार म्हणाले.
बैठकीतील निर्णय
भाजपने एक ध्येय निश्चित केले आहे. स्वबळाबर 272 जागी विजय मिळवण्याचा निर्धार भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला. देशात 400 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची निवड करण्यापूर्वी सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. 28 फेब्रुवारीला बूथ पातळीवर राष्ट्रीय बैठक होणार आहे.
‘आप’साठी रणनीती
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) जनतेकडून निधी गोळा केला होता. त्या माध्यमातून ‘आप’ने सामान्य मतदारांना आपल्या अभियानाचा घटक बनवण्याचा प्रयत्न केला. भाजपचे ‘वन नोट वन व्होट’ ही रणनीती मोदींनी तयार केली असून यातून 10 कोटी कुटुंबांशी संपर्क होणार आहे.
बैठकीला हे नेते हजर
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री मोदींसह कार्यकारिणीचे सदस्य हजर होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडचे डॉ. रमण सिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे, गोव्याचे मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.