आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मश्री तारक मेहता यांचे निधन, जगाला उलट्या चष्म्यातून पाहणारा विनोदी लेखक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जगाला उलट्या चष्म्यातून पाहणारे विनोदी लेखक पद्मश्री तारक मेहता यांचे बुधवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. ८८ वर्षीय तारक मेहता यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. गुजराती चित्रलेखा मासिकात त्यांचे “दुनियाने उंधा चश्मा’ हे सदर प्रचंड गाजले होते. 
 
मुंबईतील प्रजातंत्र दैनिकात ते काही काळ संपादक होते. १९६० ते १९८६ पर्यंत केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हीजनमध्ये, नंतर मुंबईत वृत्तांत लेखक म्हणून आणि सनदी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फेसबुक अकाऊंटवर मोदी म्हणाले, 'तारक मेहता यांनी आयुष्यभर व्यंग आणि लेखनीची साथ सोडली नाही. त्यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले. जेव्हा त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले गेले तेव्हा त्यांना भेटण्याची संधी मिळाली.'

- मोदी म्हणाले, 'तारक मेहतांच्या लेखनात भारतातील विविधतेमधील एकतेची झलक दिसते. टप्पूसह अनेक कॅरेक्टर लोकांच्या मनात घर करुन आहेत.'
 
मेहतांनी अनेक भाषांतील विनोदी लेखन गुजरातीमध्ये आणले. गुजराती नाट्य चळवळीसाठी उल्लेखनीय कार्य केले. 1971 पासून त्यांनी चित्रलेखा साप्ताहिकासाठी लेखन सुरु केले होते. विविध विषयांवर वेगळ्या अंदाजात ते भाष्य करायचे. मेहता यांनी 80 पुस्तके लिहिली आहेत. गुजराती दैनिक 'दिव्य भास्कर'साठी मेहतांनी स्तंभलेखन केले होते. त्यांच्या या स्तंभांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत. 

या स्तंभांवर आधारित 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका सब टीव्हीने 2008 मध्ये सुरु केली. 9 वर्षांपासून ही सीरियल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारत सरकारने 2015 मध्ये मेहता यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 
 
तारक मेहतांबद्दल थोडक्यात... 
- 26 डिसेंबर 1929 ला अहमदाबादमध्ये जन्मलेले तारक मेहता यांनी मुंबईमध्ये गुजराती विषयात बी.ए. आणि एम.ए. केले.
- त्यानंतर ते गुजराती नाट्य चळवळीसोबत जोडले गेले. 1958 मध्ये गुजराती नाटक मंडळी कार्यालयात त्यांना कार्यकारी मंत्री नियुक्त केले गेले. 
- 1960 ते 1986 पर्यंत ते केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजनमध्ये मुंबई येथे गॅझेटेड अधिकारी होते. 
- त्यांची मुलगी इशानी अमेरिकेत राहाते. तिला दोन मुले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...