अहमदाबाद - उत्तर प्रदेशमधील एका युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबाबत फेसबूकवर केलेल्या कमेंटमुळे गुप्तचर यंत्रणांची धावपळ उडवून दिली आहे. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कमेंटनंतर गुजरात पोलिसांनी पुन्हा एकदा मोदींच्या आई हिराबेन यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी ही कमेंट टाकणा-या युवकाचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
काय होते कमेंट?
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार युपीच्या इंझमाम कादरी नावाच्या एका व्यक्तीने फेसबूकवर कमेंट टाकली होती. मोदींच्या आईला किडनॅप केले तर त्यांच्याकडून हवे ते करून घेता येऊ शकते, अशा आशयाचे ते कमेंट होते. केंद्रिय गुप्तचर यंत्रणांच्या अधिका-यांनी याबाबत गुजरात पोलिसांना माहिती दिली, असे गुजरातच्या वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले. त्यानंतर गुजरात पोलिसांनी पुन्हा एकदा हिराबेन यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
मात्र, पोलिसांनी फेसबूकवरील या कमेंटबाबत काहीही बोलणे टाळले.
काय आहेत नियम?
नियमांनुसार पंतप्रधानांच्या कुटुंबातील व्यक्तींना एसपीजी सुरक्षा मिळत असते. मात्र मोदींच्या आईने ही सुरक्षा नाकारली आहे. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना छुप्या पद्धतीने सुरक्षा पुरवली आहे.