अहमदाबाद/ जयपूर / भुवनेश्वर - देशात महाराष्ट्रासारख्या राज्यांत दुष्काळाचे सावट गडद होत असताना गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुजरातच्या काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी
एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहे. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात तीन दिवसांपासून पूरसदृश स्थिती असून जालोर जिल्ह्यात पावसाचे चार बळी गेले आहेत. उत्तर ओडिशात आलेल्या पुरामुळे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.
गुजरातमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे उत्तर गुजरात आणि कच्छ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात आतापर्यंत पावसाचे २२ बळी गेले आहेत. बनासकाठा भागात जवळपास २५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील धरनघद्रा तळावरील लष्कराची तुकडी आणि पुणे येथील राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाची(एनडीआरएफ) तुकडी बनासकाठाला रवाना
करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती नियंत्रण विभागातील अधिकारी टी.बी. पटेल यांनी दिली. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले.
१ हजार पाळीव प्राण्यांचा मृत्यू
बनासकाठा,पाटण, मेहसाना जिल्ह्यातील २५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाऊस आणि पुरात १ हजार पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. बनासकाठातील बहुतांश भागाचा संपर्क तुटला असून अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या २४ तासांत बनासकाठा जिल्ह्यातील वडगाममध्ये ४९५ मिमी पाऊस पडला. याशिवाय दिसा ४१० मिमी, पालनपूर ३१७ मिमी, अमीरगड ३१४ मिमी आणि धनेरा ३०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संबंधित तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस झाला.
जालोर : मुसळधार
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात मुसळधार पावसाने चार जणांचा बळी घेतला. सिरोही जिल्ह्यात तीन दिवसांपासून पूरसदृश स्थिती आहे. जालोर जिल्ह्यातील नैनोल गावात दोघांचा तर दता आणि जौलसरा गावात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. दरड कोसळल्यामुळे माउंट अबू मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ आपत्कालीन सेवेतील वाहनांना परवानगी दिली जात आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत पर्यटकांना हिल स्टेशनवरच थांबण्यास
सांगितले आहे. ईशान्य रेल्वेच्या सामदारी-भिलवारी मार्गावरून धावणा-या ईशान्य रेल्वेच्या सात रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
पुढे वाचा, पूरस्थितीवर नजर : राजनाथ