आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहाँ चकमकील वादग्रस्त आयपीएस वंजारा म्हणाले, ‘अच्छे दिन आ गए’ !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली आहे. अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ५ फेब्रुवारी रोजी सशर्त जामीन दिला होता. इशरत जहाँच्या कथित चकमकीतील मृत्यू प्रकरणातील ते प्रमुख आरोपी आहेत. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी गुजरात पोलिसांविषयी बचावात्मक भूमिका घेतली.
गुजरात पोलिसांचे काहीच चुकले नसून माझे व गुजरात पोलिसांसाठी निश्चितच ‘अच्छे दिन आ गए’ असे वक्तव्य वंजारांनी केले. पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व दिले असून दहशतवाद आंतरराष्ट्रीय समस्या आहे. त्याविरुद्ध लढण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सर्व आरोपी निरापराध असल्याचा निर्वाळाही वंजारांनी दिला आहे. हे न्यायालयातही सिद्ध झाले आहे. ८ वर्षांपासून गुजरात पोलिसांचे ३२ कर्मचारी तुरुंगवासात आहेत. ते निर्दोष आहेत. नागरिकांची सुरक्षा हा पोलिसांचा धर्म असतो. प्रथमच गुजरात पोलिसांना न्याय मिळाला आहे. इतर सहकारीही लवकरच मुक्त होतील, असे वंजारा म्हणाले. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमुख अाराेपी
१५ जून २००४ रोजी अहमदाबाद पोलिसांनी व तत्कालीन पोलिस उपायुक्त वंजारा यांनी १९ वर्षीय इशरत जहाँ, तिचा मित्र जावेद शेख उर्फ प्रणेश पिल्लई आणि त्यांच्यासोबत असलेले अमजद अली राणा व जिशान जोहर यांना पोलिस एन्काउंटरमध्ये ठार केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून त्यांना ठार करण्यात आले होते. अशाच प्रकारच्या सोहराबुद्दीन व तुलसी प्रजापती एन्काउंटर प्रकरणाचाही आरोप वंजारांवर होता. गेल्या ८ वर्षांपासून ते तुरुंगात होते. साबरमती मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांच्या पत्नीसह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.