आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका स्तरावरील व्यक्ती भाजपचा मुख्यमंत्री; गुजरात काँग्रेसची घणाघाती टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- दिल्लीत बसून केंद्रातील भाजप नेत्यांना गुजरातचे राज्य चालवायचे अाहे. त्यामुळेच त्यांनी महापालिका स्तरावरील व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवले, असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला.  

गुजरात राज्यात भारतीय जनता पक्षाचे सक्षम नेतृत्व नाही. राज्यपातळीवरील नेत्यांना अडगळीत टाकण्यात आले आहे आणि महापालिका स्तरावरील  व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आले, अशी टीका काँग्रेसचे नेते अर्जुन मोधवाडिया यांनी केली. कनिष्ठ स्तराच्या नेत्याला मुख्यमंत्री केल्याने दिल्लीत बसलेल्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या ताब्यात गुजरात राहील अशी व्यवस्था करण्यात आली, असे त्यांनी म्हटले. २०१७ च्या निवडणुकासाठी प्रचार समितीचे प्रमुख म्हणून मोधवाडिया यांची काँग्रेस पक्षाने नियुक्ती केली. या निवडीनंतर मोधवाडिया पत्रकारांशी बोलत होते.  

गुजरातेत भाजप गेल्या २२ वर्षांपासून सत्तेवर आहे. १९६० मध्ये गुजरात स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले. तत्पूर्वी निम्मी वर्षे काँग्रेसची सत्ता होती. गेल्या २२ वर्षांत गुजरातसाठी यांनी काय दिवे लावले, याचा हिशेब देण्याऐवजी हे नेते प्रत्येक समस्येवर काँग्रेसला दोषी धरत आहेत, असे सांगून माेधवाडिया म्हणाले, भ्रष्टाचार, जातीय दंगली आणि इतर कारणांसाठी काँग्रेसवर टीका असलेली पोस्टरबाजी राज्यात सुरू आहे.  गुजरात विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकांत राज्यपातळीवरील भाजप नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये लढत होईल, असे सांगितले.  या निवडणुकांमध्ये बेरोजगारी आणि ढिसाळ राज्यकारभार हे प्रचाराचे मुद्दे राहतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोळंकी यांनी स्पष्ट केले.  

काँग्रेसवर फोडले खापर  
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने “काँग्रेस गुजरातसाठी योग्य आहे काय? नाही! फक्त भाजप गुजरातेत काम करते’ अशी कॅचलाइन असलेली मोठी होर्डिंग्ज  राज्यातील शहरात दिसून येत आहेत. भाजपचा प्रचार करणाऱ्या होर्डिंग्जद्वारे नर्मदा सरोवर प्रकल्प, राज्यात अशांतता आणि  गेल्या ६० वर्षांतील भ्रष्टाचारावरून काँग्रेसवर खापर फोडले जात आहे.  

राहुल गांधींचा सोमवारी दौरा  
राहुल गांधी सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर असून पक्ष कार्यकर्ते, व्यापारी आणि स्वयंसेवी संस्था यासारख्या विविध घटकांना भेटणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...