आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Government To Seek Death Penalty For Kodnani, Bajrangi

धर्मनिरपेक्ष प्रतिमेसाठी कोडनानी आणि बजरंगी बळीचे बकरे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत दोषी ठरवण्यात आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांची ‘धर्मनिरपेक्ष प्रतिमा’ तयार करण्याच्या प्रयत्नांचा भाग समजला जात आहे.

2002 मधील नरोडा- पटिया दंगलप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या 10 आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे अपील तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या दहा आरोपींमध्ये माया कोडनानी आणि बजरंगी यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या निर्णयामागील राजकारणावर जोरदार चर्चा सुरू झाली असून आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी मोदी या दोघांना बळीचा बकरा बनवत असल्याची टीका मोदींचे विरोध करू लागले आहेत.

कोण आहे माया कोडनानी?
माया कोडनानी या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कट्टर समर्थक असून त्या भाजपच्या सलग तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे. नरोडा पटिया वस्तीत अल्पसंख्याक समुदायाला घेरून त्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या त्या पहिल्याच भाजप आमदार आहेत.

वरातीमागून घोडे
कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देण्याची कालमर्यादा तीन महिन्यांची असताना राज्य सरकार तब्बल सात महिन्यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी करणारे अपील दाखल करणार आहे. आव्हान देण्याची निर्धारित कालमर्यादा संपल्यामुळे राज्य सरकारला आधी उच्च् न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पुढे काय?
2014 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहेत. या निर्णयामुळे त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा उभी करण्याचा हा प्रयत्न असला तरी भाजपचे सहकारी असलेल्या विश्व हिंदू परिषदेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना या निर्णयामुळे मोदींवर नाराज झाल्या आहेत. त्याचा जबर फटका भाजपला देशभर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर भाजपचा मतदारही नाराज होऊ शकतो.

अंग झटकणार
गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या दंगलींना मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जबाबदार धरण्यात येते. मात्र या दंगलींशी आपला काहीच संबंध नाही, असे चित्र निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कोडनानी आणि बजरंगी यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करून अंग झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मोदींचे टीकाकार करू लागले आहेत. कोडनानी आणि बजरंगी हे मोदींचे सैनिक आहेत. त्यांचा धर्म आणि हिंदुत्वाच्या नावावर त्यांचा वापर करून घेण्यात आला. त्यांच्यावरील आरोपाच्या झळा मोदींपर्यंत पोहोचू लागताच त्यांचा बळी घेण्याची तयारी करण्यात आली आहे, असे निलंबित आयपीएस संजीव भट्ट यांनी म्हटले आहे.