अहमदाबाद- पवित्र 'कुराण' ग्रंथाचा हवाला देत बीफ खाणे आरोग्यास हानिकारक असल्याचा दावा गुजरात सरकारच्या एका मंडळाने केला आहे. गोसेवा आणि गौचर विकास मंडळाने अहमदाबाद शहरातील बापुनगरात होर्डिंग लावले आहे. गाय ही आपली माता आहे. कुरानातही गायीचे संरक्षण करण्याविषयी सांगण्यात आले आहे, असे संदेश देण्यात आला आहे.
होर्डिंगवर मुख्यमंत्री आनंदीबेन आणि इस्लाम धर्माचे चिन्ह (चंद्र व तारा) दिसत आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त या होर्डिंगच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
काय आहे संदेश?'अकरामुल बकरा फिनाह सैयदुल बाहिमा' याचा अर्थ असा की, 'प्राण्यांमध्ये गाय ही अत्यावश्यक आहे. तिचा सन्मान करायला हवा, तिची पुजा करायला हवी. गायीचे दूध व तूप औषधीत वापरले जाते. मात्र, गोमांस (बिफ) अनेक आजारांचे कारण बनू शकते. गोमांस आरोग्यास हानिकारक आहे.'
काय म्हणतात मुस्लिम स्कॉलर्स?
* ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मुफ्ती अहमद देवलावी यांनी गोसेवा आणि गौचर विकास मंडळाचा दावा फेटाळला आहे. कुराणात गोमांससंदर्भात अशी कोणतीही माहिती नाही. पवित्र कुराणात कुठेच असा संदेश दिलेला नाही. अरबी वाक्याचा संदर्भ थेट कुराणाशी जोडण्यात आला आहे. मुस्लिम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सरकारने नवा फंडा शोधून काढला आहे.
* पवित्र कुराणात असा कोणताही संदेश नसल्याचे धार्मिक गुरु गुलाम मोहम्मद कोया यांनी म्हटले आहे.
* मुस्लिम धर्मात गोमांस खाण्यासंदर्भात असा कोणतेही मार्गदर्शन देण्यात आले नसल्याचे इस्लामिक विचारवंतानी दावा केला आहे.
काय म्हणाले मंडळाचे चेअरमन?
* गोसेवा आणि गौचर विकास मंडळाचे चेअरमन व माजी केंद्रीय मंत्री डॉ. वल्लभभाई कठरिया यांनी सांगितले की, होर्डिंगद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला संदेश 20 पानांच्या हिंदी व गुजराती बुकलेटमध्ये आहे. संबंधित बुकलेट त्यांच्या राजकोट येथील घरी आहे. मात्र, पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशनाचे नाव आठवत नसल्याचे डॉ. कठरिया यांनी म्हटले आहे. कठरिया सध्या गांधीनगरमध्ये आहेत.
* मंडळाच्या वेबसाइटनुसार, गोसेवा आयोगाची स्थापना 1999 मध्ये झाली. 2012 मध्ये या आयोगाचा गोसेवा व गौचर विकास मंडळात विस्तार करण्यात आला. गायीचे संवर्धनासाठी हे मंडळ काम करते. गुजरात सरकारच्याच्या कृषी विभागातंर्गत काम करते.