आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिकला मोर्चाच्या आधीच पोलिसांनी घेतले ताब्यात, गुजरातमधील इंटरनेट बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत / अहमदाबाद - पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलला शनिवारी सुरतमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. एकता मोर्चाच्या अगोदरच त्याच्यासह ५० जणांवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर सरकारने राज्यभरात मोबाइल, इंटरनेट सेवा चोवीस तासांसाठी बंद ठेवली होती.

आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर २२ वर्षीय पाटीदार नेत्याच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली होती; परंतु कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये म्हणून मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आली होती. पाटीदार समुदायाने अनेक ठिकाणी रास्ता रोकोदेखील केला. परंतु, कोणत्याही हिंसाचाराचे वृत्त नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. जाहीर सभेसाठी त्यांना परवानगी नसतानाही हा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तत्पूर्वी पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक अल्पेश कथिरिया यांनी मांगाध चौकातून वाराच्छा भागात मोर्चा काढण्यात येईल, असे जाहीर केले होते. यापूर्वीच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. त्यामुळेच या वेळी अहिंसक आंदोलन पुकारण्यात आले होते. आतापर्यंत पोलिसांनी मोर्बी शहरातून ३०० स्त्री-पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. भावनगर, ध्रोल येथेही निदर्शने झाली.
आवाज दडपण्याचा प्रयत्न
पाटीदार समुदायाचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप हार्दिकने राज्य सरकारवर केला आहे. आमचे खच्चीकरण करण्याची त्यांची इच्छा आहे. पोलिसांना राज्यात हिंसाचार घडावा, असे वाटत असावे. ही कृती लोकशाहीच्या विरोधात आहे.
पावसाची झाली मदत
एकता मोर्चासाठी हार्दिक पटेल यास सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यानंतरही हार्दिक आपल्या भूमिकेवर ठाम होता. शनिवारी अचानक मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कार्यकर्ते पांगले. राहिलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पावसामुळे पोलिसांचे काम सोपे झाले.
कोणावरही अन्याय नाही : मुख्यमंत्री कोणावरही काहीही अन्याय झालेला नाही. कायदा आपले काम करेल, असे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी स्पष्ट केले. त्या दक्षिण गुजरातच्या मांडवीमध्ये बोलत होत्या. हार्दिक पटेलला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आली. दरम्यान, बोटाद-सुरत तसे अहमदाबादमध्ये काही जागी संतप्त लोकांना बसवर दगडफेक केली.