आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातेत बोनसमध्ये 1660 कर्मचाऱ्यांना कार. 400 जणांना घरे देणार डायमंड कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावजीभाई १६६० कर्मचाऱ्यांना कार आणि घर भेट देणार आहेत. - Divya Marathi
सावजीभाई १६६० कर्मचाऱ्यांना कार आणि घर भेट देणार आहेत.
सूरत- हिरे उद्योग असलेल्या हरेकृष्णा एक्स्पोर्ट या प्रतिष्ठानने कामगिरीच्या आधारावर बोनस म्हणून १६६० कर्मचाऱ्यांना ५१ कोटी रुपये किमतीच्या कार आणि ४०० जणांना हक्काची घरे तसेच बचतीच्या हेतूने रक्कम देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संस्थापक सावजी ढोलकिया यांनी दिवाळीच्या आधीच्या स्नेहमिलन सोहळ्यात ही घोषणा केली.

यंदा कंपनीच्या १७१६ कर्मचाऱ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झाली. यातील १२०० कर्मचाऱ्यांचे वेतन १० ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. ४०० जणांना घरे देण्याचा निर्णय झाला आहे. दोन वर्षांच्या आत त्यांना घरांचा ताबा मिळेल. घरांसाठी लाभार्थींना डाऊन पेमेंट म्हणूनही पैसे भरावे लागणार नाहीत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक दडपण येऊ नये म्हणून कंपनी दरमहा हजार रुपयांचा हप्ता पाच वर्षांपर्यंत भरणार आहे. या कालावधीनंतर उर्वरित रकमेचे कर्ज घेण्यासाठीही कर्मचाऱ्यांना मदत केली जाणार आहे. कारसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना मारुती अाणि निसान कंपनीच्या निवडक माॅडेलची निवड करावी लागणार आहे. गतवर्षी ४९१ कार, २०० घरे आणि अलंकार बोनस म्हणून देण्यात आले होते. यंदा अशा प्रकारचा बोनस मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा १७००च्या वर गेला आहे.

भावाने भावाला दिली कार : एकाहिरा कर्मचाऱ्याला मिळणारी कार त्याने आपल्या भावाला दिली जावी, अशी विनंती केली आहे. त्याचा भाऊदेखील हिरा व्यवसायातच आहे. भावाभावांतील अशी आत्मीयता हरेकृष्णासारख्या कंपनीतच पाहायला मिळते, असे सावजीभाई अभिमानाने सांगत होते.

पुढील वर्षी सर्व ५५०० कर्मचाऱ्यांकडे घरे, कार
हरेकृष्णा एक्स्पोर्टचे चेअरमन सावजी ढोलकिया म्हणतात, पुढील वर्षी कंपनी २५ वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे पुढील वर्षीपर्यंत सर्व ५५०० कर्मचाऱ्यांना हक्काची घरे आणि कार असावी अशी इच्छा आहे. हे एक आव्हानच होते आणि आम्ही ते स्वीकारले आहे. मला स्वत:लाच कारचा शौक आहे. त्यामुळे मारुती ८०० बाजारात आली होती तेव्हाच दोन कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मी ती दिली होती.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...