आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहता बंगला विकून विकसित केले बालोद्यान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमधील एका दांपत्याने मुलगा, सून व नातवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपले राहते घर विकून बालोद्यान विकसित केले आहे. तेथे आता सोसायटीतील मुले खेळू बागडू लागतात. त्यातच हे दांपत्य समाधान मानत जीवन जगत आहे.

अहमदाबाद येथील सरलाबेन आणि महेश ठक्कर यांची ही अनोखी गोष्ट आहे. 2009 मध्ये एका अपघातात त्यांचा मुलगा, सून आणि दोन नातवाचा मृत्यू झाला. आपल्यावर ओढावलेल्या या अपार दु:खाबद्दल सुरुवातीला ते ईश्वराला दोष देत असत, परंतु नंतर त्यांनी स्वत:ला सावरले. महेश ठक्कर सांगतात, ‘सर्वस्व लुटले गेले, परंतु त्याचे दु:ख उगाळत बसण्यापेक्षा आम्ही स्वत:ला सावरले. मुलाने खरेदी केलेला राहता बंगला विकला. त्यातून दीड कोटी रुपये आले. त्यातून एक प्लॉट खरेदी केला. त्यावर लहान मुलांसाठी उद्यान विकसित केले. तेथे खेळणी लावली. या पार्कमध्ये खेळणार्‍या मुलांमध्ये आम्हाला आमचा मुलगा, सून, नातू दिसतात आणि त्यातच आम्ही समाधान मानतो. असे वाटते की, ईश्वराने आमची चार लेकरे घेऊन आम्हाला 100 मुले दिली आहेत.’

रामकथा ऐकून सुचला विचार
महेशभाई यांनी सांगितले की, पार्कचा विचार त्यांना रामकथा ऐकून सुचला. काश्मीरला जाण्यापूर्वी मुलाने एक बंगला खरेदी केला होता. या बंगल्यात राहणारेच निघून गेले तर मग बंगला ठेवून तरी काय करायचे? म्हणून तो बंगला विकला आणि त्यातून जागा विकत घेऊन बालोद्यान विकसित केले. मैदान स्वच्छ केले, तेथे झाडे लावली, झोपाळा, घसरगुंडी, खेळणी बसवली. ही कल्पना आपल्याला रामकथा ऐकून सुचल्याचे ते म्हणाले.

मुलांची देखरेख करतात
सरलाबेन आणि महेश ठक्कर सायंकाळी बागेत स्वत: हजर राहतात. चॉकलेट देऊन मुलांचे स्वागत करतात. तेथे ते मुलांची देखरेख करतात. त्यांच्या भरवशावर पालकही निश्चिंत होऊन मुलांना खेळायला पाठवतात. खेळून झाल्यावर मुलांना घरी जाऊन अभ्यास करण्याचा सल्ला देतात. तीन वर्षांपूर्वी जगण्याची उमेदच हरवली होती, परंतु या बागेमुळे आम्हालाच नवजीवन प्राप्त झाले. आमच्या आयुष्यात समाधान पुन्हा परतले आहे, असे ते म्हणतात.