आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक रिपोर्ट : मोदींची लाट की जातींचा लढा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातमध्ये 26-0चे स्वप्न बाळगून आशादायी चित्र रंगवणार्‍या भाजपला नऊ एप्रिल रोजी मोदींच्या उमेदवारी अर्जानंतर संपूर्ण राज्यात गुजराती वडाप्रधानची लाट येईल, असा विश्वास आहे.
या सुनामीच्या आशेवर भाजपने आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी रणनीती तयार केली आहे. दुसरीकडे काँग्रेससमोर आपली प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना मिळणार्‍या 35-40 मतांच्या टक्केवारीनुसार जास्तीत जास्त जागा मिळाव्यात या दृष्टीने ते रणनीती आखत आहेत. सध्याच्या लोकसभेत येथे भाजपचे 15, तर कॉँग्रेसचे 11 खासदार आहेत.
राज्यात भाजप आणि काँग्रेसच्या मुद्दय़ांचा विचार केल्यास याप्रकरणी भाजप बळकट स्थितीत आहे. त्यांच्याकडे गुजराती वडाप्रधान, राज्याचा विकास, काँग्रेसचा भ्रष्टाचार, महागाई तसेच घराणेशाही आदी मुद्दे आहेत. काँग्रेसकडे केवळ राज्यातील भ्रष्टाचार आणि केंद्र सरकारच्या विकास योजना व जातीयतेचे मुद्दे आहेत. या व्यतिरिक्त काँग्रेसने आपल्या तिकीट वाटपाच्या धोरणातून भाजपच्या अनेक जागा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणामुळे भाजपच्या पारड्यात दहा, तर काँग्रेसच्या खात्यात पाच जागा जमा होतील असे दिसते. उर्वरित 11 जागांपैकी सात जागा भाजपकडे, तर चार जागांवर काट्याची लढत होईल. या 11 जागांमध्ये जुनागड, बनासकांठा, सुरेंद्रनगर, राजकोट, पंचमहाल, खेडा, बारडोली, वलसाड, छोटा उदेपूर, कच्छ आणि पाटण आहेत.
जुनागड जागेवर भाजप सुरुवातीस मजबूत स्थितीत होती. गेल्या आठवड्यात उमेदवार बदलल्यामुळे काँग्रेसने बाजू पालटवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा काँग्रेसने अहीर समाजाच्या जसाभाई बारड यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी कोळी समाजाच्या पुंजाभाई वंश यांना मैदानात उतरवण्याचा सल्ला दिला. भाजपने आधीपासूनच कोळी समाजाचे राजेश चुडासामा यांची उमेदवारी जाहीर केली. जुनागड जागेवर दोन्ही पक्षांचे उमेदवार कोळी समाजाचे असल्यामुळे मत विभाजन होणार आहे. भाजप-काँग्रेसमध्ये जातीय समीकरणांचा लढा एकट्या जुनागडमध्येच नव्हे, तर राज्याच्या नऊ लोकसभा मतदारसंघांत होत आहे. या दोन्ही पक्षांनी एकाच जातीचे उमेदवार उभे केले आहेत. काट्याची टक्कर असणार्‍या तिकिटांचे चुकीचे वाटप आणि गटबाजीमुळेही भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. राजकोट जागेवर कडवा आणि लेऊवा पटेल यांना तिकीट देण्याच्या मुद्दय़ावर भाजपमध्ये पक्षांतर्गत विरोध आहे. गेल्या आठवड्यात गटबाजी एवढय़ा विकोपाला गेली की राजकोट कार्यालयाला कुलूप ठोकणे भाग पडले. यानंतर दुसर्‍या दिवशी कुलूप उघडण्यात आले. अमरेली मतदारसंघात रंजक स्थिती आहे. येथे भाजपचे नारण काठडिया, काँग्रेसचे वीरजी ठुमर आणि आम आदमी पार्टीच्या (आप) नाथालाल सुखडिया यांच्यात लढत आहे. सुखडिया लेऊआ पटेल समाजाचे आहेत. याच पद्धतीने भाजपचे बंडखोर उमेदवार मनुभाई चावडा कोळी समाजाचे आहेत.
भाजप धोरणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मोदींच्या सभेतून यात बदल होईल. मोदी गुजरातमध्ये भलेही सात-आठ सभा करतील, मात्र या सभा दोन-तीन जागांवर परिणाम होऊ शकणार्‍या ठिकाणी होतील. गांधीनगर, अहमदाबाद पूर्व, अहमदाबाद पश्चिम, पोरबंदर, भावनगर, वडोदरा, जामनगर, नवसारी आणि सुरतसारख्या मतदारसंघात भाजप बळकट स्थितीत आहे.