आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Muslim A Wheel Of Development, Narendra Modi Said In Muslim Industralist Seminar

हिंदू-मुस्लिम विकासाची चाके, मुस्लिम उद्योजकांच्या परिषदेत नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आता मुस्लिम समुदायाचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. शुक्रवारी गुजरातमधील मुस्लिम उद्योजकांसाठी आयोजित बिझनेस विथ हर्मनीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. विकासाच्या यात्रेत हिंदू-मुस्लिम दोन चाके आहेत. विकासासाठी निरोगी समाजाची गरज असते. त्यासाठी सर्वांना सोबत घेतले पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदींनी मुस्लिम समुदायाची स्तुतीही केली. मुस्लिम समुदायाच्या मुलांमध्येच ईश्वर काही गुण देऊन पाठवतो; परंतु उपाशीपोटी देव-देव करणे शक्य होत नाही. ना इबादत, ना भजन, असे मोदींनी सांगितले. बिझनेस विथ हर्मनीचे आयोजन गुजरात सरकारने मुस्लिम उद्योजकांच्या मदतीने केले होते. तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. दोन समुदायातील उद्योजकांना परस्परांशी जोडण्याची यातून कसरत होईल, असे मानले जाते. विशेष म्हणजे संमेलनाचे उद्घाटनही शुक्रवारीच ठेवण्यात आले होते.
* उपाशीपोटी देव-देव होत नाही
* देशाला दाखवली गुजराती मुस्लिमांची प्रगती
1. गुजरातच्या पतंग उद्योगात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. सरकारने या उद्योगाला बळकटी दिली. त्यामुळे मुस्लिम समुदायाचा विकास झाला. यातून हा उद्योग 35 हून 700 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला.
2. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य असते. गुजरात सरकारने सर्वांना अशी संधी दिली. आम्ही गरीब मुस्लिमांबद्दलही विचार केला. दोन्हींच्या (हिंदू-मुस्लिम) विकासामुळेच गुजरातचा विकास झाला.
3. कच्छमधील व्यापाराची मोठी भागीदारी मुस्लिम समुदायाकडे आहे. राज्याच्या इतर भागातही मुस्लिमांनी खूप प्रगती केली. ही केवळ वानगीदाखल उदाहरणे असल्याचे मोदींनी संमेलनात आवर्जून सांगितले.
मोदींचा कल मुस्लिमांकडे
14 जानेवारी : सलमानची भेट घेतली. पतंग उडवला. उडवताना बोट कापले म्हणून सलमानने त्यांच्यावर मलमपट्टीदेखील केली. मोदींशी सलमानची ही पहिलीच भेट होती. तीदेखील सर्वात मोठा सण असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशीच.
5 फेब्रुवारी : कोलकाताच्या रॅलीत हज अनुदानाचा उल्लेख केला. गुजरातमध्ये 4800 चा कोटा आहे. अर्ज 37 हजार असतात. प. बंगालमध्ये 12 हजार असतात. गुजरातमध्ये मुस्लिम संपन्न आहेत.
7 फेब्रुवारी : आणि आता गुजरात सरकारकडून मुस्लिम उद्योजकांच्या संमेलनाचे आयोजन.
मोदींचे दावे वरुण गांधींनी फोल ठरवले
मोदींच्या कोलकातामधील रॅलीचे वर्णन भाजपचे सरचिटणीस वरुण गांधी यांनी ‘रॅली ठिकठाक होती’ असे केले. रॅलीत आलेल्या लोकांची संख्या अवाच्या सव्वा सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात दाव्याच्या एक चतुर्थांश एवढेच लोक रॅलीत सहभागी झाले होते. केवळ 4 हजार 550 एवढेच लोक जमले असावेत, असे वरुण यांनी म्हटले आहे. वरुण प.बंगालचे प्रभारीदेखील आहेत. विशेष म्हणजे कोलकात्यात एवढा जनसागर कधीही पाहिला नव्हता, असे मोदींनी म्हटले होते.
काँग्रेसचा पलटवार : निवडणूक आल्याचे पाहून भाजप आणि मोदी यांना मुस्लिमांची आठवण झाली आहे. ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी आपले धोरण बदलले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणाले.