जुनागड (गुजरात)- गुजरातचे गिर अभयारण्य चार महिन्यांसाठी बंद करण्यात येत आहे. यादरम्यान पर्यटकांना प्रवेशास बंदी असेल. या प्रवेशबंदीपूर्वीच एक गोड बातमी आली आहे. येथे असलेल्या १०० सिंहिणी गर्भवती आहेत. म्हणजे यंदा मान्सूनमध्ये अंदाजे २०० नवजात छाव्यांची डरकाळी जंगलात ऐकू येईल. वन विभागाचे कर्मचारी आणि अाशियन सिंहांचे चाहते या बातमीने खुश आहेत.
गेल्या वर्षी सिंहाची गणना झाली तेव्हा संख्येत २७ % ची वाढ दिसून आली. या वर्षी मात्र यात अधिक वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. गिर वन विभागाचे अनुभवी नायब वन संरक्षक नवल अपारनाथी यांनी सांगितले की, ज्या गतीने संख्या वाढत आहे त्यावरून असे दिसते की गिरमधील निम्म्या सिहिंणींनी पिलांना जन्म दिला तर छाव्यांच्या संख्येत १५० ते २०० नी वाढ होईल. नायब वन संरक्षक अपारनाथी यांनी सांगितले की बहुतांश सिंहिणी छाव्यांना जन्म देतात. क्वचित ४-५ पिलेही होतात. पैकी वाचली तरीही यंदा संख्येत चांगली वाढ होईल.
मधल्या काळात गिरमध्ये केवळ १० ते १२ सिंह जिवंत होते. जुनागडच्या नवाबांनी शिकारीवर बंदी आणली तेव्हापासून सिंहांची संख्या वाढत आहे. गिरचे वनक्षेत्र १४१२ वर्ग किलोमीटरपर्यंत पसरले आहे. आता संख्या वाढल्याने सिंह साैराष्ट्र, जुनागड, अमरेली, सोमनाथ, भावनगर आणि पोरबंदर जिल्ह्यांतील एकूण २२ हजार वर्ग किमीमध्ये वावरत आहेत.
मे २०१५ मध्ये झालेल्या गणनेनुसार सौराष्ट्रात १०९ सिंह, २०१ सिंहिणी आणि २१३ छावे आहेत. मुख्य वन संरक्षक डॉ. ए. पी. सिंह यांनी सांगितले की, सिंह बचाव मोहिमेमुळे त्यांच्या बालमृत्युदरात घट झाली आहे. त्यांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. वन विभाग रिसर्च रेस्क्यू सेंटर, कर्मचाऱ्यांची सतर्कता यामुळे नवजात छाव्यांना वाचवण्यात यश येत आहे.त्यामुळेही संख्येत वाढ दिसून येत असल्याचे डॉ. सिंह म्हणाले.