आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे निधन, कन्या मल्लिकाची नृत्यांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - भरतनाट्यम व कथकलीच्या नृत्यांगना मृणालिनी साराभाई (९७) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी अहमदाबादेत निधन झाले. "अम्मा' नावाने प्रसिद्ध मृणालिनी या अंतराळ वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या पत्नी होत्या. त्यांनी दर्पण अकादमी स्थापली. तिचे जगभरात १८ हजारांवर शिष्य आहेत. त्यांनी ३०० पेक्षा जास्त नृत्ये-नाट्यांत नृत्यदिग्दर्शन केले.
अम्मांना वाटायचे की मी, ‘मी’च व्हावे...
प्रत्येक मायलेकीत जवळीक नसते. प्रत्येक आई तिच्या मुलीला स्वतंत्र अस्तित्वासाठी प्रोत्साहित करत नाही. मात्र, अम्मांची इच्छा होती की मी फक्त ‘मी’च बनावे, तिचे प्रतिबिंब नव्हे. मी नृत्य करावे, असे ती कधीच म्हणाली नाही. बरीच वर्षे वाटायचं की मला नृत्य करायचे नाही. पण नृत्यांगना बनायचं ठरवल्यानंतर आईची व माझी अनोखी गट्टी जमली. मी १९७६ मध्ये नृत्यास प्रारंभ केल्यानंतर आईने "मीरा' नृत्यनाटिका रचली. त्यात आम्ही दोघींनी भूमिका केल्या. एकीने मनातील मीरा दुसरीने बाहेरची मीरा साकारली. अम्मा एक शब्द म्हणायची, मी त्याचे वाक्य बनवायचे. अम्मा विचार करायची अन् मी ते साकारायचे. भारतीय नृत्यकलेसाठी त्यांनी नवे मार्ग रचले. शास्त्रीय शैलीशी आधुनिक विचार गुंफले. लोकांचा संशयही दूर केला. १९६३ मध्ये सौराष्ट्रात हुंड्यामुळे मुलींच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्येच्या बातम्यांनी ती विव्हल व्हायची. त्यावर तिने ‘मेमरी इज रेज्ड फ्रॅगमेंट ऑफ इटर्निटी’ ही नृत्यनाटिका रचली. यात अम्माने प्रथमच भरतनाट्यमचा वापर धिक्कारासाठी केला. भरतनाट्यम व कथकलीस नवीन भाषा-विचारांचे परिमाण दिले. याच भाषेला नव्या विचारांनी भारून ‘दर्पण’ मध्ये काम करणारे आम्ही सर्व त्यांची मशाल पुढे नेऊ. अम्मा छान लिहायची, बोलायची. त्याचा वारसा आमच्या नसानसांत राहील.
- मल्लिका साराभाई