बाडरेली - राहुल गांधी यांनी गुजरातच्या बाडरेलीमध्ये शनिवारी दोन किमी पदयात्रा काढून मोदींना आव्हान दिले. निमित्त होते काँग्रेसच्या विकास शोध यात्रेच्या समारोपाचे. महात्मा गांधी यांची हत्या संघाच्या विचारसरणीतूनच झाल्याचे सांगून थेट नाव न घेता राहुल म्हणाले, ‘काही लोक चहा विकतात, काही टॅक्सी चालवतात, काही शेतीकाम करतात. या सर्वांनाच सन्मान द्यावा. मात्र, जे उल्लू बनवतात त्या लोकांना भाव का द्यायचा?’
‘गुजरातमध्ये अन्नाअभावी आदिवासी उपाशी मरत आहेत. नरेंद्र मोदी विकासाच्या गप्पा मारतात, पण गुजरातमधील वास्तव सांगत नाहीत,’ अशा शब्दांत राहुल यांनी गुजरात करत असलेल्या विकासाच्या दाव्यांची खिल्ली उडवली.
नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर
1. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर : 9 वर्षांपासून गुजरातेत लोकायुक्त नेमला जाऊ शकला नाही. भाजप भ्रष्टाचाराच्या बाता मारते, पण जेव्हा आम्ही लोकपाल विधेयक संसदेत मांडले तेव्हा कामकाजात बाधा आणली.
2. गुजरातच्या विकासावर : आम्ही गरिबी दूर करण्याच्या गोष्टी करतो. ते गरिबांनाच हटवण्याच्या गोष्टी करतात. राज्यात 6 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.
3. संघ व पटेल यांच्यावर : इतिहासच माहीत नाही आणि मोदी पटेल यांचा भव्य पुतळा उभारायला निघाले आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्याची पटेल यांची इच्छा होती.