आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचे नेतृत्व दुबळ्या नेत्यांच्या हाती : नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद / वॉशिंग्टन - परराष्ट्र धोरणात विद्यमान सरकार अपयशी ठरले असून देशाचे नेतृत्व दुबळ्या नेत्यांच्या हाती असल्याची टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

गुजरात दिवसाच्या निमित्ताने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी यांनी अमेरिकेतील वीस शहरातील गुजराती नागरिकांशी सुमारे एक तास संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी विकासाच्या मुद्यासह सरकारच्या धोरणांवर आपल्या नेहमीच्या शैलीत टिप्पणी केली. देशाची हानी का होत आहे, याची मला जाणीव आहे. देशाचे नेतृत्व दुबळे असल्यामुळेच हे चित्र दिसून येते. गेल्या महिन्यातील घटनेकडे पाहा म्हणजे बर्‍याच गोष्टी समजू शकतील. मला तर धक्काच बसला. चीनने आपल्या सरहद्दीतून त्यांचे सैनिक माघारी घेतले, परंतु भारतीय सैनिक मागे का हटले, ही गोष्ट मला समजू शकली नाही. याचा अर्थ आपण आपल्याच भूमीतून मागे हटलो आहोत का ? लडाखबाबत केंद्र सरकारला माझा साधा प्रश्न आहे. चीनने केले ते समजले परंतु भारताने मागे हटण्याचे कारण काय ? हे प्रश्न सामान्य माणसाच्या मनातही आहेत.

विकासाची नवी परिभाषा
गुजरातमधील बारा वर्षांच्या कारकीर्दीत विकासाचा नवा अर्थ आपण जनतेला दिला आहे. सध्या देशासमोर विश्वासाचे मोठे आव्हान आहे. कारण देशातील सरकार भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडाले आहे. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. ही वाटचाल यशस्वी करण्याचे सर्व श्रेय राज्याबरोबर जगभरातील सहा कोटी गुजरातींनाच द्यावे लागेल, असे मोदींनी सांगितले.

चिकन बिर्याणीची ऑफर
काय तुम्ही कल्पना करू शकाल आपल्या जवानांचे शीर कापून फेकले जाते ? आणि काही दिवसांनी त्या देशाच्या पंतप्रधानांना चिक बिर्याणीची ऑफर दिली जाते. ही गोष्ट पुन्हा सवाल उत्पन्न करणारी आहे. मार्च महिन्यात परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी जयपूरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांच्या स्वागतासाठी लंचचे आयोजन केले होते, याची आठवण मोदी यांनी भाषणातून करून दिली.

विश्वास गमवला
देशासमोर सर्वात मोठे आव्हान कोणते असा सवाल मला लोक विचारतात. तेव्हा देशात कोणाचाच कोणावर विश्वास राहिलेला नाही, असे मला दिसते. त्यातूनच आत्मविश्वासाचा अभाव हे मोठे आव्हान देशासमोर असल्याचे वाटते. ही बाब भयंकर आहे. आपल्या सर्वांना मिळून हा विश्वास पुन्हा निर्माण करावा लागणार आहे. हा विश्वास व्यवस्था, प्रक्रिया, उद्दिष्ट, धोरण, नैतिकता यातून दाखवावा लागेल. हेच सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्याला नेत्यावरील विश्वास निर्माण करावा लागेल, असे मोदींनी म्हटले.

पुतळ्यासाठी मदत करा
न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून दुप्पट उंच असलेला सरदार पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. परदेशातील गुजराती समुदायाने पुतळ्याच्या प्रकल्पात आपले योगदान द्यावे. त्यानंतर तो जगातील सर्वात उंच पुतळा ठरेल, असे आवाहन मोदींनी केले.