आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी दैवत होते, पण कामी पडले नाहीत; डी.जी. वंजारा यांचे गुजरात सरकारला पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - सहा वर्षांपासून तुरुंगात असलेले आणि चार बनावट एन्काउंटर प्रकरणांतील आरोपी माजी डीआयजी डी.जी. वंजारा यांनी आयपीएस दर्जाचा राजीनामा दिला आहे. परंतु मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करत वंजारा यांनी गुजरात सरकारला 10 पानी पत्र पाठवले आहे. या पत्रात ते म्हणतात, मोदी यांना मी देव मानत होतो. त्यामुळेच आजवर गप्प राहिलो. पण ते मात्र अमित शहा यांच्या इशार्‍यावरच चालतात. शहा हे त्यांच कान-नाक झाले आहेत. राज्याचे कणा नसलेले सरकार केवळ शब्दांचे बुडबुडे निर्माण करते. कामगिरीत मात्र ते भेकड आणि नपुंसक आहे’, असे आरोप वंजारा यांनी केले आहेत. 1987च्या तुकडीचे अधिकारी वंजारा यांना सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणात 2007मध्ये अटक करण्यात आली होती. पत्राच्या सातव्या पानावर शेवटच्या परिच्छेदात वंजारा यांनी चारही एन्काउंटर सरकारच्या सांगण्यावरूनच करण्यात आले, मग सीबीआयने आम्हा अधिकार्‍यांनाच कसे दोषी ठरवले, असा सवाल केला आहे.


पत्र ठरणार पुरावा
वंजारा यांनी पत्राची एक प्रत सीबीआय संचालकांनाही पाठवली आहे. सीबीआय त्यातील तथ्ये पुरावा म्हणून कोर्टात ठेवू शकते. अमित शाह यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करू शकते. हे पत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.


शहा हेच मोदी यांचे कान आणि डोळे मोदींवर विश्वास असल्याने मी आजवर गप्प राहिलो. त्यांना देव मानत होतो. गरजेच्या वेळी मात्र माझा हा देव कामी आला नाही हे खेदाने म्हणावे लागते. अमित शहा त्यांचे कान आणि डोळे झाले आहेत. 12 वर्षांपासून दिशाभूल करत शेळीला कुत्रा व कुत्र्याला शेळी करत आहेत.


राज्याच्या सरकारची खरी जागा तुरुंगातच सीबीआय धोरणे ठरवणार्‍यांना अटक झाली पाहिजे. आम्ही तर सरकारच्या निर्देशांचे पालन केले. आमच्या हालचालींवर संस्थेची करडी नजर होती. गांधीनगरऐवजी सरकारच नवी मुंबईतील तळोजा किंवा साबरमतीच्या तुरुंगात असायला हवे.


मोदी यांनी आधी आमचे कर्ज फेडावे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाचे कर्ज फेडण्याच्या बाता करतात. चांगले आहे. प्रत्येक भारतीयाचे ते कर्तव्य आहे. पण दिल्लीकडे कूच करण्याच्या घाईत त्यांना तुरुंगात असलेल्या अधिकार्‍यांचे कर्ज फेडण्याचे विस्मरण होऊ नये, ज्यांच्यामुळे त्यांच्या नावामागे बहादूर शब्द आहे. त्यांना शहांचीच चिंता आहे.
सरकारची कातडी वाचवण्याची धडपड सरकारला आम्हाला वाचवण्यात स्वारस्य नाही. सीबीआयपासून कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात आम्हा अधिकार्‍यांना तुरुंगातच ठेवण्याची त्यांची इच्छा दिसते. राजकीय लाभासाठी 12 वर्षांपासून एन्काउंटर प्रकरण जिवंत ठेवले आहे.


बनावट एन्काउंटरप्रकरणी 6 वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी डीआयजी वंजारा यांचा दहा पानी पत्रासह राजीनामा