जामनगर - गुजरामध्ये जामनगर येथे बंद अवस्थेत असलेल्या सोलेरियमला नवे रूप देऊन सुरू करण्यात येणार आहे. नगर परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून हे सोलेरियम सुरू झाले तर सर्व प्रकारच्या आजारांवर सौर उपचार करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्वच आजारांवर येथे फक्त सूर्यकिरणांमार्फत उपचार केले जातात.
सौर उपचारांसाठी १९३३ मध्ये हे सोलेरियम बांधण्यात आले होते. आशिया खंडातील या प्रकारचे हे एकमेव उपचार केंद्र आहे. येथे प्रत्येक आजारावर उपचारांसाठी विशिष्ट प्रकारचे काचेच्या केबिन तयार करण्यात आल्या आहेत. सूर्यकिरणांची क्षमता अडीच पटीने वाढवण्याची क्षमता या काचेत होती. या काचांखाली आणखी एक फिल्टर काच बसवलेला होता. त्यामुळे रुग्णाला जेवढ्या तप्त किरणांची गरज आहे तेवढेच त्याच्या शरीरावर सोडले जात होते. आता हे सर्व काच फुटलेल्या अवस्थेत असून जगात कुठेही ते मिळू शकत नाहीत.
तीन प्रकारचे किरण
येथे तीन प्रकारच्या सूर्यकिरणांनी उपचार केला जात होता. यात इन्फ्रारेड, अल्ट्रा व्हायोलेट आणि संपूर्ण रॅडिएशनसाठी विशिष्ट प्रकारच्या काच लावण्यात आल्या होत्या. या माध्यमातून रामबाण उपचार केले जात होते.
असे आहे सोलेरियम
याची उंची ४० फूट असून लांबी ११४ फूट आहे. यात १३ बाय ९ फुटाच्या १० केबिन असून या केबिन सूर्याच्या िदशेने फिरू शकत होत्या. दर १० -१५ मिनिटाला या केबिन फिरत राहत.