आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या रणाविना कच्छचे रण! रण महोत्सवातून मिळणाऱ्या आर्थिक उलाढालीचीच चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खावडा (भूज, गुजरात)- गुजरातमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीचे रण तापले असताना दुसरीकडे कच्छच्या रणातील पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातल्या रहिवाशांमध्ये मात्र निवडणुकीपेक्षाही चर्चा आहे ती नुकताच प्रारंभ झालेल्या रण महोत्सवाची. अर्थात, त्यामागे कारण आहे ते महोत्सवातून स्थानिकांना मिळणारे रोजगार आणि यानिमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल. 


गुजरात विधानसभेची निवडणूक सध्या देशभरात औत्सुक्याचा विषय ठरली आहे. मात्र, याच राज्यातील पाक सीमेलगत असणाऱ्या कच्छच्या रणाचा परिसर निवडणुकीच्या धामधुमीपासून अगदी अलिप्त दिसतो. ना कुठे झेंडे, ना फलक, ना प्रचार रथ आणि ना निवडणुकीची चर्चा असा इथला माहौल आहे. कच्छचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या भूजपासून अवघ्या ६० किलोमीटरवर असलेले खावडा हे पाक सीमेवरील त्यातल्या त्यात मोठे गाव असो की पुढे आणखी १२-१५ किलोमीटरवरचे कुरन हे छोटे खेडे असो इथे निवडणुकीची साधी चर्चासुद्धा ऐकायला मिळत नाही. बहुसंख्य स्थानिकांना तर मतदान कधी आहे वा उमेदवार कोण आहेत ते सुद्धा माहिती नाही. त्यापेक्षा या लोकांना उत्सुकता आहे ती गेल्या २५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रण महोत्सवाची. 


काही वर्षांपासून कच्छच्या होडका गावानजीकच्या ‘सफेद रण’ (मिठाचे आगर) भागात रण महोत्सव भरवायला प्रारंभ झाला अन् बघता बघता त्यासाठी देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी होऊ लागली. ऑक्टोबरची अखेर ते मार्चचा प्रारंभ या काळात भरणाऱ्या या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद बघून सरकारने गेल्या काही वर्षांत येथे पर्यटकांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याने पाहुण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. परिणामी, या भागातल्या अर्थकारणाचे चक्र गतिमान झाले असून स्थानिकांना वेगवेगळे रोजगार मिळू लागले आहेत. शेतीयोग्य जमीन आणि औद्योगिकरण या दोन्हीची वानवा असल्याने परिसरातल्या रहिवाशांना अगोदर वर्षभर मुख्यत्वे गायी, म्हशी, शेळ्या, उंट यांच्या पालनावर अवलंबून रहावे लागायचे. पण, आता सहा महिन्यांसाठी का होईना महोत्सवामुळे लोकांना पैसे कमावण्याचा नवा स्रोत मिळाला आहे. त्यामुळे या भागातील मंडळींसाठी निवडणुकीत कोण निवडून येईल वा कुणाच्या सभेला किती गर्दी झाली यापेक्षा महोत्सवाला किती गर्दी होत आहे तो अधिक जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवाय, या भागात लोकवस्ती विरळ स्वरूपाची असल्याने आपल्या काही लोकसभा मतदारसंघांपेक्षाही इथल्या विधानसभा मतदारसंघाची व्याप्ती आणि भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. साहजिकच शे-दीडशे किलोमीटरवरील एखाद्या गावचा उमेदवार निवडणूक रिंगणात असेल तर इतर ठिकाणच्या रहिवाशांना त्याचे फारसे सोयरसुतक दिसत नाही. 


मुस्लिमबहुल लोकवस्ती
पाकिस्तान सीमेलगतची ही अनेक गावे मुस्लिमबहुल लोकवस्तीची आहेत. मात्र, बहुचर्चित गुजरात दंगलींच्या पार्श्वभूमीवरही येथे फारसे सामाजिक अंतर पडल्याचे जाणवत नाही. उलट हिंदू-मुस्लिम सलोखा आणि शांतता याकडे स्थानिक नागरिकांचा कल दिसून येतो. 

 

> आमच्या भागात निवडणुकीबद्दल फारसे कुणाला देणे-घेणे नाही. राजकीय लोक निवडणुकीपुरते येतात आणि मग गायब होतात. आता मतदान तोंडावर आले असले तरी इकडे फारसे कुणी फिरकलेले नाही. पण या वेळी काँग्रेससमोर भाजपचे मोठे आव्हान असेल. 


आशिष गणात्रा (युवक, खावडा) 
निवडणुकीबाबत इकडे फारसा उत्साह नाही. त्यापेक्षा लोक आपापल्या कामकाजाला जास्त महत्त्व देतात. आमच्याकडे सामाजिक एकोपा टिकून असल्याने फारसा संघर्ष नाही. ६०० लोकवस्तीच्या आमच्या गावात तर निवडणुकीचे वारेसुद्धा नाही. आमचा भाग आजवर काँग्रेससाठी अनुकूल राहिला आहे. 
- सुलेमान मुतुआ (फुलाई, नखत्राणा) 

बातम्या आणखी आहेत...