आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा निकाल घसरल्यास शिक्षकांना वेतनवाढ नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या यशाचा टक्का घसरल्यास त्याचा परिणाम शिक्षकांना भोगावा लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी गुजरातच्या शिक्षण विभागापुढे अशा प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
या योजनेवर तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अधिका-याने सांगितले. मुलांचा निकाल घसरलेल्या शाळेतील शिक्षकांना वेतनवाढ दिली जाणार नाही. या वर्षी बोर्ड परीक्षेत राज्यातील १८३ शाळांचा दहावी आणि बारावीत शून्य टक्के निकाल लागला. तसेच तीन हजारांपेक्षा जास्त शाळांचा ३० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागला. साधारणपणे अशा पद्धतीच्या प्रकरणांत शिक्षण विभाग मुख्याध्यापक/ प्राचार्याची वेतनवाढ रोखते आणि शाळांच्या अनुदानात कपात करते. मात्र, नव्या प्रस्तावातून पहिल्यांदाच शिक्षकांची वेतनवाढ रोखली जात आहे. असे असले तरी शिक्षण विभागाने यासंदर्भात अद्याप स्पष्ट भूमिका मांडली नाही. मुख्याध्यापकांवर कारवाई आणि अनुदान कपात करून विशेष फरक पडत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे कारवाईच्या कक्षेत शिक्षकांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे सू़त्रांनी सांगितले. शिक्षकांची शालेय स्तरावर नियुक्ती होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर थेट कारवाई करू शकत नाही. त्यामुळे निकालाचा आढावा घेण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली जात आहे. ही समिती ढिसाळ कामगिरी करणा-या शाळांमध्ये पाच योजना राबवेल. चांगला निकाल न देणा-या शाळांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल देणा-या शाळा दत्तक घेतील. या शाळा अधिका-यांना सल्ला देतील, शिक्षकांना प्रशिक्षण देतील.

तसेच अशा शाळांसाठी स्वतंत्र शैक्षणिक नियोजन केले जाईल. ग्रामीण विभागातील शिक्षणाधिका-याच्या म्हणण्यानुसार, जुलैमध्ये वेतनवाढ होत असल्यामुळे आमच्या कार्यालयाअंतर्गत येणा-या सर्व शाळांना परिपत्रक पाठवण्यात आले आहे.
अनेक घटक कारणीभूत
दुसरीकडे प्रिन्सिपल असोसिएशनचे अध्यक्ष नीरव ठाकूर म्हणाले, निकाल घसरण्यामागे विविध कारणे आहेत. यामध्ये एक आरटीआयअंतर्गत मुलांना आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याची अट हे आहे. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा नववीत येतो तेव्हा त्याला मूळ संकल्पना स्पष्ट नसतात. त्याचा परिणाम निकालावर होतो. त्यामुळे समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.