वेरावल (गुजरात)- पवित्र ज्योतिर्लिंग सोमनाथ येथील मंदिरात यापुढे फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळणार आहे. मात्र, हिंदु सोडून इतर धर्मातील लोकांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. ही सूचना मंदिर परिसरात लावलेल्या बोर्डवर लिहण्यात आली आहे.
सूचना गुजराती भाषेत लिहली आहे ज्याचा अर्थ आहे असा आहे...
श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग तीर्थधाम हे फक्त हिंदुंचे तीर्थधाम आहे. या पवित्र तीर्थधाममध्ये इतर धर्मिय लोकांना दर्शन अथवा प्रवेश करायचा असेल तर जनरल मॅनेजर ऑफिसशी संपर्क साधून परवानगी घेण्यात यावी. परवानगी मिळाल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. - श्री सोमनाथ ट्रस्ट प्रभास पाटण
ट्रस्टची अधिकृत प्रतिक्रिया नाही-
दरम्यान, याबाबत जेव्हा ट्रस्टच्या अधिका-यांना गाठले तेव्हा त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सोमनाथ मंदिर हे फक्त हिंदूंचे पवित्र मंदिर आहे. त्यामुळे येथे त्यांनाच प्रवेश दिला गेला पाहिजे असे आम्हाला वाटते. तीच बाब लक्षात घेऊन ट्रस्टद्वारे हा निर्णय घेतला आहे. मात्र इतर धर्मियही मंदिरात प्रवेश करू शकतात मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. तरीही विशेष काळात म्हणजे शिवरात्री या अन्य सणांच्या दिवशी मंदिरात हिंदूना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.